नाशिक : सत्तेच्या शेवटच्या पर्वात नाशिक शहरात खासगी संस्थांच्या मदतीतून साकारण्यात आलेल्या लोकोपयोगी कामांचे ब्रॅडिंग थेट सिने सृष्टीतील तारे-तारकांपुढे सादर करून पाठीवर कौतुकाची पाठ थोपटून घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांना पाचारण करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.‘एकदा नाशिक महापालिकेची सत्ता माझ्या ताब्यात द्या, बघा विकास काय असतो तो’ अशी नाशिककरांना पाच वर्षांपूर्वी साद घालणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून महापालिकेची सत्ता ताब्यात देण्यात आली त्यानंतर दर महिन्यातून पंधरा दिवसाआड नाशिकला भेट देऊन विकास साधू असे सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काहीकाळ नाशिक महापालिकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी व महापालिकेचे अंतर्गत राजकारणामुळे मनसेमध्येच दुफळी माजली. पक्षातील एकेक नेते सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडले तर नगरसेवकांनीही काळाची पावले ओळखून पक्षापासून फारकत घेतली. पाच वर्षे मनसे सत्तेत असतानाही नाशिककरांना (राज ठाकरे यांच्या दृष्टीतील) विकास दिसला नाही, जी काही कामे झालीत ती कुंभमेळ्यासाठी मिळालेल्या निधीतून करण्यात आली असे असताना पुन्हा निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी काही तरी भरीव कामे करण्यास शेवटच्या वर्षांत सुरुवात झाली व त्यासाठी राज यांनी आपले व्यक्तिगत संबंध वापरून टाटा, अंबानी या उद्योगपतींच्या माध्यमातून काही प्रकल्प राबविले.त्यातील गोदापार्क विकास हादेखील एक प्रकल्प असून, त्याच्या भूमिपूजन समारंभाला थेट मुकेश अंबानी यांनाच नाशिकमध्ये आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला, परंतु त्यावेळी फसलेला हा प्रयोग ठाकरे यांनी नेहरू उद्यानात साकारलेल्या ‘बॉटनिकल गार्डन’वेळी यशस्वी करून दाखविला. प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांना नाशिकच्या भूमीत पाचारण करून ठाकरे यांनी टाटांकडून आपली पाठ थोपटून घेतली. (प्रतिनिधी)
आधी तारे-तारका, आता रतन टाटा
By admin | Updated: January 31, 2017 02:22 IST