जगातील पहिली ‘सोलर’ मेट्रो नागपुरात धावणार
By Admin | Updated: May 19, 2015 01:41 IST2015-05-19T01:41:27+5:302015-05-19T01:41:27+5:30
मेट्रो रेल्वेसाठी दररोज लागणाऱ्या विजेपैकी सुमारे ४० टक्के वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून मेट्रो स्टेशनवरच तयार केली जाईल.

जगातील पहिली ‘सोलर’ मेट्रो नागपुरात धावणार
नागपूर : नागपुरात धावणारी मेट्रो रेल्वे ही सौर ऊर्जेवर (सोलर एनर्जी) धावणारी जगातील पहिली मेट्रो ठरणार आहे. मेट्रो रेल्वेसाठी दररोज लागणाऱ्या विजेपैकी सुमारे ४० टक्के वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून मेट्रो स्टेशनवरच तयार केली जाईल. सहा-सात वर्षानंतर हा सौर ऊर्जा प्रकल्पही पूर्णपणे मेट्रो रेल्वेच्या मालकीचा होणार आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, २०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पाला जर्मनीने अर्थसहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे.
इंडो-जर्मन सोलर को-आॅपरेशन अंतर्गत हा प्रकल्प समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे सोलर प्रकल्पासाठी मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर कुठलाही आर्थिक भार येणार नाही. मे च्या शेवटच्या आठवड्यात जर्मनीची तांत्रिक चमू नागपुरात येत असून त्यावेळी अर्थसाहाय्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक स्टेशन व दोन्ही डेपोवर सोलर पॅनल लावले जातील. स्टेशनची रचनाही तशीच केली जाईल. यापासून सुमारे ३० मेगावॅट वीज मिळविण्याची योजना आहे.
नागपूर कर्क वृत्तावर आहे. त्यामुळे येथे ऊन जास्त असते. हेच ऊन आता नागपूर मेट्रोसाठी वरदान ठरेल. सौर ऊर्जेचा वापर मेट्रो रेल्वे प्रकल्पात केला नसता तर खर्चाचा आकडा वाढला असता. या प्रकल्पामुळे नागपूर मेट्रो ही स्वत:च्या सौर ऊर्जेवर चालणारी जगातील पहिली मेट्रो ठरेल, असे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.