राज्यात पहिले सौर शीतगृह होणार अकोल्यात!
By Admin | Updated: January 1, 2017 01:59 IST2017-01-01T01:59:32+5:302017-01-01T01:59:32+5:30
महाबीज बांधणार: ३६0 कोटी खर्च; आरकेव्हीवाय अंतर्गत मिळणार ५0 टक्के अनुदान

राज्यात पहिले सौर शीतगृह होणार अकोल्यात!
अकोला, दि. ३१- भाजीपाला बियाणे साठवणुकीसाठी राज्यातील पहिले आद्र्रता विरहित सौर शीतगृह (कोल्ड स्टोरेज) अकोल्यात होणार आहे. ३६0 कोटी रुपये खचरून बांधण्यात येणार्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) या शीतगृहाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५0 टक्के अनुदान उपलब्ध होईल.
अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत १0 हजार स्केअर फूट जागेवर हे शीत गोदाम होणार आहे. अनेक वेळा भाजीपाला बियाण्यांची मागणी घटल्यास बियाणे साठवून ठेवण्यात येते. महाबीजकडे एक शीतगृह आहे; परंतु त्या शीतगृहाची साठवण क्षमता र्मयादित असल्याने महाबीजने नवीन गोदामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्याने महाबीजने सौर शीतगृहाच्या कामास सुरुवात केली आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी केले.
भाजीपाला बियाणे सुरक्षित राहण्यासाठी आद्र्रता विरहित, पूरक तापमान या गोदामात असेल. खासगी कंपन्याचे भाजीपाला बियाणे महागडे असून, शेतकर्यांना परवडत नसल्याने महाबीजच्या भागधारक शेतकर्यांनी महाबीजने भाजीपाला बियाणे निर्माण करावे यासाठीची मागणी सातत्याने केली आहे. म्हणूनच महाबीजने भाजीपाला बियाणे उत्पादनात पाऊल टाकण्याचा निश्चय केला आहे. त्या दृष्टीने शीतगृह उभारणी आणि तेही सौर ऊर्जा शीतगृह बांधणे हे महत्त्वाचे मानले जात आहे.
- राज्यातील पहिले सौर ऊर्जेवर आधारित शीतगृह अकोल्यात बांधण्यात येत आहे. ३६0 कोटींच्या या शीतगृहात भाजीपाला बियाणे साठवणूक केली जाईल.
रामचंद्र नाके,
महाव्यवस्थापक (विपणन),
महाबीज, अकोला.