सोमवारी पहिल्या राउंडची सोडत

By Admin | Updated: March 4, 2017 03:37 IST2017-03-04T03:37:07+5:302017-03-04T03:37:07+5:30

आरटीई अर्थात राइट टू एज्युकेशनअंतर्गत खाजगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

First round trophy on Monday | सोमवारी पहिल्या राउंडची सोडत

सोमवारी पहिल्या राउंडची सोडत

सुरेश लोखंडे,
ठाणे- दुर्बल व वंचित घटकांच्या कुटुंबातील बालकांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आरटीई अर्थात राइट टू एज्युकेशनअंतर्गत खाजगी शाळेत २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील ८११ शाळांमधील १६ हजार ४५५ जागांसाठी आॅनलाइन केवळ आठ हजार ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिलीच्या वर्गासह ज्युनिअर केजी आणि नर्सरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता लॉटरी पद्धतीने सोडत काढली जाणार आहे.
या सोडतीद्वारे नशीब काढणाऱ्या बालकांना महागड्या शाळेत विनामूल्य शिक्षण घेता येणार आहे. या लॉटरी सोडत पद्धतीने दुर्बल व वंचित घटकातील बालकांना २०१७-१८ या वर्षासाठी प्रवेश मिळणार आहेत. येथील कोर्टनाक्याजवळील ठाणे पोलीस स्कूल, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे ही सोडत काढली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. एप्रिलअखेरपर्यंत लॉटरी सोडतचे सुमारे पाच राउंड काढले जातील. यातील पहिला राउंड सोमवारी आहे. यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली उत्तम दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह अन्यही भाषिक शाळांमध्ये हा प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये सीबीएससी बोर्ड, एसएससी बोर्ड, आयसीएसई, आयबी आदी प्रकारच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित या आठ हजार ११ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश निश्चित केले आहेत.पहिलीसह ज्युनिअर केजी व नर्सरीच्या वर्गामधील १६ हजार ४५५ जागांसाठी केवळ आठ हजार ५२ अर्ज आले आहेत.
प्रवेश देऊनही जागा रिक्त राहणार असल्याचे प्राप्त अर्जावरून उघड होत आहे. यासाठी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे व दुर्बल घटकामध्ये मोडणारे, अपंग, एसटी, एससी प्रवर्गातील बालकांना या महागड्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.
>महापालिका शाळांत मिळणार मोफत प्रवेश
अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्यांसह मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडी या महापालिकांमधील शाळांमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. ५९७ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गामध्ये १२ हजार ६०५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. यासाठी तर ८७ ज्युनिअर केजीच्या शाळांमध्ये एक हजार ७९७ आणि १२८ नर्सरी शाळांमध्ये दोन हजार ५३ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

Web Title: First round trophy on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.