‘राज्यातील पहिली औद्योगिक नगरी मिरजेत होणार’
By Admin | Updated: February 12, 2015 00:36 IST2015-02-11T21:42:34+5:302015-02-12T00:36:44+5:30
अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (बुधवारी) येथे दिली.

‘राज्यातील पहिली औद्योगिक नगरी मिरजेत होणार’
कुपवाड : मिरजेत महाराष्ट्रातील पहिली औद्योगिक नगरी (टाऊनशिप) अस्तित्वात येणार असून, हा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (बुधवारी) येथे दिली. मिरज एमआयडीसीमधील मुख्य आणि अंतर्गत अशा आठ कोटींच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रारंभ उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, उद्योग उभारणी प्रक्रियेत सुलभता यावी, हा चांगला व सकारात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून आम्ही पुढे जात आहोत. उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक वेळेवर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्योग विकासात लक्ष घातले आहे. सध्या उद्योग उभारताना ७६ प्रकारचे परवाने घ्यावे लागतात. ती संख्या कमी करून २५ वर आणणार आहे. यापूर्वी अडवणूक करण्यासाठी कायदे करण्यात आले. आम्ही त्यात सुलभता आणणार आहोत. आता विविध विभागांची परवानगी काढण्यात उद्योजकांना आयुष्य खर्च करावे लागणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
राज्यातील विविध एमआयडीसींमध्ये विनावापर पडून असलेल्या जागा काढून घेणार आहोत. त्याअंतर्गत तीनशे जणांना नोटिसा दिल्या आहेत. ते भूखंड काढून घेऊन नव्या उद्योजकांना देणार आहोत. त्यामुळेही उद्योग वाढतील. उद्योजकांचा एलबीटीला विरोध असून, आता जीएसटीची आकारणी होणार आहे.
करदात्यांना विश्वासात घेऊन करआकारणी होणे गरजेचे आहे. महापालिकेने कररूपाने महसूल गोळा केल्यावर त्या वसाहतींना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी मतदार नाहीत, म्हणून विकास न करणे चुकीचे आहे.
आम्ही उद्योग खात्यातर्फे उद्योजकांना चांगले वातावरण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकार स्थिर झाले असून, उद्योजकांनाही स्थिर करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
त्यामुळेच उद्योग उभारणीची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. परिणामी, राज्यात उद्योग निश्चितपणे वाढतील, असा विश्वास उद्योगमंत्री देसाई यांनी व्यक्त केला.
उद्योजकांसाठी आता रेड कार्पेट
महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. या राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी, तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी आम्ही गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांसाठी रेड कार्पेट घालणार आहोत.