आधी अमित शहांची संपत्ती जाहीर करा
By Admin | Updated: February 15, 2017 03:47 IST2017-02-15T03:47:55+5:302017-02-15T03:47:55+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजपा खासदार किरीट सोमय्यांविरोधात शिवसेनेने मंगळवारी जोरदार आघाडी

आधी अमित शहांची संपत्ती जाहीर करा
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजपा खासदार किरीट सोमय्यांविरोधात शिवसेनेने मंगळवारी जोरदार आघाडी उघडली. सोमय्यांना इतकीच हौस असेल, तर त्यांनी आधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची संपत्ती जाहीर करावी. कसलेही पुरावे न देता, बिनबुडाचे आरोप करण्याचा सोमय्या यांचा धंदा असल्याची टीका शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबंध असून, त्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी केले होते. यावर स्वत:च्या खासदारकीच्या लेटरहेडवर इतरांच्या संपत्ती तपासण्याचा अधिकार सोमय्यांना दिला कोणी, असा सवाल राहुल शेवाळे यांनी केला. राष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये घोटाळ्याचा दावा करणाऱ्या सोमय्या यांनी २०१६ साली स्वत:च पंतप्रधान कार्यालयाला पत्र देऊन सदर प्रकरण दाबले. या घोटाळ्यातील सोमय्यांच्या संशयास्पद सहभागाची चौकशी व्हावी. आरोपांच्या नावाखाली सोमय्या यांनी ब्लॅकमेलिंगचा धंदा उघडला आहे, असा आरोपही शेवाळे यांनी केला. अनेक ट्रॅव्हल कंपन्या, फार्मसी कंपन्या, शेअर बाजारातील काही कंपन्यांच्या माध्यमातून सोमय्या आर्थिक गैरव्यवहार करतात. शेअर बाजारात दरवर्षी पाच हजार कोटींचा घोटाळा होतो. विविध कंपन्यांच्या माध्यमातून घोटाळा करायचा आणि भाजपाला पैसे पाठवायचे काम
सोमय्या करतात. इनाम फायनान्शियलचे इन्व्हेस्टमेंट बँकर वल्लभ भन्साळी यांच्या आणि किरीट सोमय्यांच्या संबंधांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेखर वैष्णव यांनी केली. (प्रतिनिधी)