लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास आजपासून महाग
By Admin | Updated: June 1, 2015 04:58 IST2015-06-01T04:58:52+5:302015-06-01T04:58:52+5:30
रेल्वे भाडेवाढ होणार की नाही याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे रेल्वे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न

लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास आजपासून महाग
मुंबई : रेल्वे भाडेवाढ होणार की नाही याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे रेल्वे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्र्यांकडून करण्यात आला. मात्र सर्वसाधारण अर्थसंकल्पात सेवा कर वाढवण्याची शिफारस करण्यात आल्याने रेल्वे प्रवास महाग होणार आहे. १ जूनपासून वाढीव सेवा कर लागू होत असून, एक्स्प्रेस गाड्यांच्या एसी फर्स्ट क्लास प्रवासाबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास प्रवासही महाग होणार
आहे. एसी आणि फर्स्ट क्लासच्या प्रवासात अर्ध्या टक्क्याने वाढ होणार आहे.
भाजपाची केंद्रात एकहाती सत्ता येताच ‘अच्छे दिन आएंगे’ असे सांगत अनेक स्वप्ने दाखवण्यात आली. पण सत्ता येताच पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात दुप्पट भाडेवाढ करण्यात आली आणि त्याचा मुंबईकरांना मोठा फटका बसला. पास आणि तिकीट शुल्कात वाढ झाल्याने त्याला उपनगरीय लोकल प्रवाशांनी विरोध केला. त्यामुळे मोठी भाडेवाढ मागे घेऊन अल्प भाडेवाढच लागू केली. रेल्वे मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याने नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातही भाडेवाढ होईल, अशी शक्यता होती. मात्र भाडेवाढ होणार नसल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
परंतु दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला. लोकलच्या फर्स्ट क्लास पासावर आणि एसी तिकिटावर सध्या सेवा कर हा १२.३६ टक्के असून, त्यामध्ये ७० टक्के सूट देण्यात येते आणि तो कर ३.७ एवढा आकारला जात होता.
आता हाच कर १ जूनपासून जवळपास १४ टक्के एवढा होणार असून, त्यामध्ये नेहमीप्रमाणे ७० टक्के सूट दिल्यानंतर ४.२ टक्के एवढा होईल. यामुळे उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लासचा पास तसेच तिकीट आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी फर्स्ट, एक्झिक्युटिव्ह क्लास, सेकंड आणि थर्ड एसी, एसी चेयर कार, एसी इकॉनॉमी क्लासची तिकिटे महागणार आहेत. (प्रतिनिधी)