आधी सरकार, नंतर मुख्यमंत्री ठरवू - दिग्विजय सिंग
By Admin | Updated: August 27, 2016 18:13 IST2016-08-27T18:13:15+5:302016-08-27T18:13:15+5:30
गोव्यात अगोदर कॉंग्रेसचे सरकार आणू आणि नंतर मुख्यमंत्री कोण ते ठरवू असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजयसिंग यांनी सांगितले आहे
आधी सरकार, नंतर मुख्यमंत्री ठरवू - दिग्विजय सिंग
>- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 27 - गोव्यात अगोदर कॉंग्रेसचे सरकार आणू आणि नंतर मुख्यमंत्री कोण ते ठरवू असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजयसिंग यांनी मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आम आदमी पार्टी आणि भाजप यांचा कॉंग्रेसमूक्त भारतासाठी गुप्त करार असल्याचा त्यांनी आरोप केला.
निवडणुकीनंतर गोव्यात कॉंग्रेसचे सरकार येणार आहे. भाजप सरकारला जनता विटली असून निवडणुकीतत्याची प्रचिती येणार आहे असे दिग्विजय सिंग यांनी कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. कॉंग्रेसचा मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार कोण आहे असे विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री नंतर ठरविला जाईल, कॉंग्रेसचे सरकार आणणे हे पहिले लक्ष्य असेल असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसमुक्त भारत हे भाजप आणि आम आदमी पार्टीचा संयुक्त नारा आहे. या दोन्ही पक्षांचे उद्धीष्ट एक आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी दिल्लीत विविकानंद फाऊंडेशनमध्ये झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल हे सहभागी होते. त्यांनी या विधानाचा इन्कार करून दाखवावा असे आव्हानही त्यांनी दिले.
गोव्यात भाजप हा कॉंग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. गोव्यात आम आदमी पार्टीला स्थान नाही, परंतु हा पक्ष मतविभागणी करून भाजपला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही त्यांची संयुक्त रणनीतीही आहे असे ते म्हणाले.
कॅसिनोला विरोध नाही पण...
गोव्यात ऑफ शोर कॅसिनोंच्या विरोधात कॉंग्रेस नाही. कॉंग्रेसनेच कॅसिनो गोव्यात आणले होते. परंतु हे कँसिनो मांडवितून हटविले जावेत. किती लांब अंतरावर समुद्रात त्यांना ठेवण्यात यावे हे ही निश्चित केले जावे ही पक्षाची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने तर प्रत्येक मुद्द्यावर यू टर्न घेतल्याचे त्यांनी सांगितले.