बाल न्यायमंडळ आवारात गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 18:06 IST2016-08-17T18:06:09+5:302016-08-17T18:06:09+5:30

बापाने संशयितावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी (१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास उंटवाडीतील बाल न्यायमंडळाच्या आवारात घडली.

Firing in child court premises | बाल न्यायमंडळ आवारात गोळीबार

बाल न्यायमंडळ आवारात गोळीबार

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 17 - मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने संशयितावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी (१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास उंटवाडीतील बाल न्यायमंडळाच्या आवारात घडली. या घटनेत जखमी झालेल्या खुनातील संशयित विधीसंघर्षित बालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयित प्रलिन श्यामकांत बाविस्कर (रा. मालेगाव) विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर ते फरार झाले आहेत. दरम्यान, बाल न्यायमंडळाबाहेर गोळीबाराची ही पहिलीच घटना असून सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 
मालेगाव येथील व्यावसायिक प्रलिन श्यामकांत बाविस्कर यांचा मुलगा मोहितेश (१७,रा. गोळे कॉलनी, वसतिगृह, नाशिक) हा शिक्षणासाठी नाशिकमध्ये होता. १४ आॅक्टोबर २०१५ रोजी त्याचा मालेगावमधील दहावीपर्यंतचा वर्गमित्र व नाशिकमध्ये ओळख झालेला ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथील दुसरा मित्र संशयित आकाश प्रभू (१८) या दोघांनी २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्र्यंबकेश्वर येथे फिरण्याच्या नावाखाली बुलेटवर नेऊन दगडाने ठेचून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.
मोहितेश बाविस्करच्या खुनातील संशयित त्याचा वर्गमित्र हा विधीसंघर्षित असल्याने न्यायालयाने त्याची रवानगी किशोर सुधारालयात तर दुसरा संशयित आकाश प्रभू यास पोलीस कोठडी सुनावली होती. या खटल्याची सुनावणी उंटवाडीतील बालन्यायमंडळाच्या न्यायाधीश अंजली कोळपकर यांच्याकडे सुरू असून, आज तारीख असल्याने संशयितास बालन्यायमंडळासमोर हजर करण्यात आले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास सुनावणीनंतर तो न्यायालय आवारात आला असता संशयित प्रलिन बाविस्कर याने गोळीबार केला. 
यामध्ये बंदुकीची गोळी संशयित विधीसंघर्षित बालकाच्या डाव्या हाताला चाटून गेल्याने त्यास किरकोळ दुखापत झाली असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर घटनेनंतर प्रलिन बाविस्कर हे फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या गोळीबारात जखमी झालेल्या विधीसंघर्षित बालकावर जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात उपचार सुरू असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Firing in child court premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.