भाजपाच्या जिल्हा सरचिटणीसावर गोळीबार
By Admin | Updated: February 19, 2017 15:36 IST2017-02-19T15:36:13+5:302017-02-19T15:36:13+5:30
महामार्गालगत लघुशंकेसाठी थांबलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार आत्माराम ननावरे यांच्यावर दोन युवकांनी गोळीबार केला.

भाजपाच्या जिल्हा सरचिटणीसावर गोळीबार
आॅनलाईन लोकमत
सातारा/काशीळ, दि. 19 - महामार्गालगत लघुशंकेसाठी थांबलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार आत्माराम ननावरे (वय ३९, रा. कोळकी, ता. फलटण) यांच्यावर दोन युवकांनी गोळीबार केला. मात्र, यामध्ये ते बालंबाल बचावले. ही थरारक घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बोरगावजवळ घडली.
नंदकुमार ननावरे हे शनिवारी दुपारी कारमधून कऱ्हाडला गेले होते. रात्री ते परत फलटणला निघाले होते. बोरगावजवळील उड्डाणपुलाच्या पुढील बाजूस आल्यानंतर त्यांनी लघुशंकेसाठी कार थांबविली. कारच्या पाठीमागील बाजूस उभे असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. मोठा आवाज झाल्याने त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता दुचाकीवर दोन युवक होते. त्यातील पाठीमागे बसलेल्या युवकाच्या हातात पिस्तूल होते. काही क्षणातच दोघेही हल्लेखोर तेथून पसार झाले. ननावरे ययांच्या कारमधील सीटवर गोळी लागल्याचा खुणा आहेत. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या ननावरे यांनी तत्काळ बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. परंतु हल्लेखोर सापडले नाहीत.
गोळीबार झाल्याचे समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासाच्या अनुषंगाने त्यांनी बोरगाव पोलिसांना सूचना केल्या. पोलिसांना घटनास्थळी पिस्तूलमधील पुंगळी सापडली आहे. ही पुंगळी चाचणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे बोरगाव पोलिसांनी सांगितले. संबंधित दोन अनोळखी युवकावर ३०७ (खुनाचा प्रयत्न)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
काळ्या रंगाचे शर्ट !
हल्लेखोरांनी काळ्या रंगाचे शर्ट परिधान केले होते. दोघांनीही तोंडाला काहीही बांधले नव्हते. मात्र, इतर वाहनांच्या प्रकाशझोतामुळे ननावरे यांना त्यांचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर महामार्गावरून सातारा बाजूकडे सुसाट निघून गेले.
नंदकुमार ननावरे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय द्वेषातून हल्ला झाला की अन्य कारणातून, याचा पोलिस शोध घेत आहेत. नागठाणे, बोरगाव तसेच परिसरातील सीसीटीव्हीची तपासणीही पोलिसांकडून सुरू आहे.