पुन्हा गोळीबार; टोळीयुद्ध पेटले
By Admin | Updated: January 13, 2015 01:02 IST2015-01-13T01:02:31+5:302015-01-13T01:02:31+5:30
चांदणी चौक गोळीबार प्रकरण अद्याप शांत झाले नाही, तोच सोमवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला

पुन्हा गोळीबार; टोळीयुद्ध पेटले
अमरावतीतील घटना : उपमहापौरा साथीदार आरीफ गंभीर; तिघांना अटक
अमरावती : चांदणी चौक गोळीबार प्रकरण अद्याप शांत झाले नाही, तोच सोमवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर १० ते १२ हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करुन दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आरीफ लेंड्या गंभीर जखमी झाला असून त्यांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांवर दगडफेक केल्याने हल्लेखोर दुचाकी सोडून पसार झाले.
या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून परिसरात तगडा बंदोबस्त केला आहे.
चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील शेख जफरचा साथीदार सैयद आरीफ ऊर्फ लेंड्या सैयद साबीर (४२) गुलिस्तानगरातील रहिवासी आहे. एक आठवड्यापूर्वीच आरीफ लेंड्या जामिनवर बाहेर आला. माहितीनुसार गुलिस्तानगरात आरीफ लेंड्याचा भाऊ राहत असून त्यांच्या मुलीचे रविवार लग्न झाले. दुसऱ्या दिवशी यवतमाळात रिसेप्शन असल्यामुळे सर्व नातेवाईक सायंकाळी ४ वाजता तयारीत लागले होते. यावेळी आरीफ लेंड्या भावाच्या दुकानासमोर मोबाईलवर बोलत होता.
सलमानने पाहिली गोळीबारची घटना
आरीफ लेंड्याचा नातेवाईक सलमान नावाचा युवक त्यावेळी घराबाहेर उभा होता. त्याने आरडाओरड केल्याने नागरिक बाहेर आले. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे क्युआरटी पथकासह घटनास्थळी पोहचले. सलमानने घटनेची माहिती दिली. सहायक आयुक्त एल.एन.तळवींनी नागपुरी गेट ठाण्यात त्याचे बयाण नोंदविले.
आज जफरच्या जामिनावर सुनावणी
चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार उपमहापौर शेख जफर याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी सुनावणी होणार आहे. आरीफ लेंड्यावर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी शेख जफर हा नागपुरी गेट पोलीस ठाण्यात उपस्थित होता.
जुन्या वैमनस्यातून झाला हल्ला
जुन्या वैमन्स्याहून आरीफ लेंड्या यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा अंदाज प्राथमिक चौकशीत समोर आला आहे. चांदणी चौक गोळीबार प्रकरणात झालेल्या गोळीबारात आरीफ लेंड्याचा सहभाग होता. कारागृहातून बाहेर आल्यावर सोमवारी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०७, १४३, १४७, १४८, आणि ३, २५ आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.