कडेपूर येथील भांडी, फर्निचर दुकानाला आग
By Admin | Updated: October 31, 2016 05:06 IST2016-10-31T05:06:05+5:302016-10-31T05:06:05+5:30
कडेपूर (सांगली) येथील यशवंत भांडी आणि फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.

कडेपूर येथील भांडी, फर्निचर दुकानाला आग
कडेगाव : कडेपूर (सांगली) येथील यशवंत भांडी आणि फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
कडेपूर येथे कराड- विटा रस्त्यावर डोंगराई मंगल कार्यालयाच्या समोर यशवंत भांडी आणि फर्निचरचे दुकान आहे. दुकान मालक सूरज चंद्रकांत तवटे (रा. मलकापूर, ता. कराड) व अन्य कामगार दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, रात्री ९ च्या सुमारास दुकानात भीषण आग लागली. या आगीचा लोळ कडेपूर व परिसरात दिसू लागताच लोकांनी धाव घेतली. जवळपासच्या सर्व अग्निशमन दलांना फोन लावला. दरम्यान, कराड नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी आली आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यापूर्वी दुकानातील लाखोंचे फर्निचर साहित्य जळून खाक झाले. (वार्ताहर)