हेलिकॉप्टरमधून फेकला आगीचा गोळा!
By Admin | Updated: April 9, 2016 03:23 IST2016-04-09T03:23:58+5:302016-04-09T03:23:58+5:30
जमिनीपासून अवघ्या दीडशे ते दोनशे फुटांवरून जंगलात आगीचे गोळे फेकणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून पुसला प्रकल्पातही आगीचा धगधगता गोळा फेकण्यात आला

हेलिकॉप्टरमधून फेकला आगीचा गोळा!
वरूड (जि. अमरावती) : जमिनीपासून अवघ्या दीडशे ते दोनशे फुटांवरून जंगलात आगीचे गोळे फेकणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून पुसला प्रकल्पातही आगीचा धगधगता गोळा फेकण्यात आला. मात्र, तो पाण्यात पडल्याने स्फोट झाला नाही. पुसला प्रकल्पालगतच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी-शेतमजुरांनी ही माहिती गुरुवारी पोलीस व वनविभागाच्या चौकशी पथकाला दिली. त्यामुळे या
घटनेचे गूढ अधिकच गहिरे झाले आहे.
हेलिकॉप्टरमधून जंगलात आगीचे गोळे पडल्याने वरूड वनपरिक्षेत्रातील २५ एकर जंगल बेचिराख झाले. बुधवारी दुपारी घडलेला हा प्रकार परिसरातील काही ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिला. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.
जमिनीच्या अगदी जवळ आलेल्या हेलिकॉप्टरमधून बुधवारी दुपारी आगीचे गोळे खाली फेकल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाल्याचे व परिसरात धुराचे लोळ उठल्याचे प्रत्यक्षदर्शी वनमजूर चरण पाटील यांनी सांगितले. आगीचे गोळे फेकणारे ते पांढऱ्या रंगाचे हेलिकॉप्टर मध्यप्रदेश सीमेतून आल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी चौकशी पथकाला दिली.
राज्यासह राज्याबाहेरील सर्व एव्हिएशन सेंटर्स व विमानतळांना माहिती देऊन रडारवरून हे हेलिकॉप्टर कोठून आले, याची माहिती घेण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणेने देखील या घटनेची दखल घेतली असून यासंदर्भात वनविभाग आणि पोलीस यंत्रणा उच्चस्तरीय चौकशी करीत आहे.
> मध्यप्रदेश सीमेवरून पांढऱ्या रंगाचे हेलिकॉप्टर बुधवारी अत्यंत कमी उंचीवरून घिरट्या मारत होते. त्यातून आगीचा गोळा पुसली प्रकल्पात फेकण्यात आला. परंतु हा गोळा पाण्यात पडल्याने त्याचा स्फोट झाला नाही. पुढे हे हेलिकॉप्टर वाईकडे निघून गेले.
- अविनाश डकरे, शेतकरी, पुसली
पांढरे हेलिकॉप्टर कोठून व कशासाठी आले?, आगीचे गोळे फेकण्याचे कारण नेमके काय?, याचा शोध युद्धस्तरावर घेतला जात आहे.
- दादाराव काळे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वरूड