कसारा घाटात आॅइल कंटेनरला आग
By Admin | Updated: July 4, 2014 06:17 IST2014-07-04T06:17:33+5:302014-07-04T06:17:33+5:30
गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास कसारा घाटात आॅइल घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक चार तास विस्कळीत झाली.

कसारा घाटात आॅइल कंटेनरला आग
कसारा : गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास कसारा घाटात आॅइल घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक चार तास विस्कळीत झाली.
तुर्भ्याहून नाशिककडे आॅइलचे ड्रम घेऊन जाणारा कंटेनर कसारा घाट चढत असताना अचानक त्याच्या केबिनमागून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखून चालक विजय चौहान कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने अचानक पेट घेतला. कंटेनर पेटत असल्याचे लक्षात येताच चालकाने उडी मारून जीव वाचवला. या घटनेची माहिती मिळताच कसारा वाहतूक पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले.
या घटनेमुळे नाशिककडे जाणाऱ्या गाड्या कंटेनरपासून ५०० मीटर दूरवर उभ्या केल्याने पुढील अनर्थ टळला. कंटेनरने उग्र रूप धारण केल्याने कसारा पोलिसांनी गॅमन इंडिया व महिंद्रा कंपनीच्या अग्निशामक गाड्यांना पाचारण केले. तब्बल चार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. कंटेनरची आग इतकी भयानक होती की, दूरवरच्या झाडांसह कंटेनरही पूर्णत: जळून खाक झाला.
कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यशवंत सोलसे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनावणे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह पहाटे ५.४० पासून घटनास्थळी दाखल होते. त्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक लतीफवाडीहून पर्यायी रस्त्याने सोडण्याची व्यवस्था ते करीत होते. मात्र, वाहनांची संख्या जादा असल्याने कसारा घाटात सुमारे २०० ते ३०० गाड्या अडकून पडल्या होत्या. तब्बल चार तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. नवीन कसारा घाटात दुहेरी मार्ग अप-डाऊन सुरू केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, कसारा घाटात अडकून पडलेल्या वाहनचालकांचे हाल झाले. (प्रतिनिधी)