‘एफआयआर’ आॅनलाईन उपलब्ध होणार?

By Admin | Updated: January 21, 2015 00:20 IST2015-01-21T00:20:07+5:302015-01-21T00:20:07+5:30

‘एफआयआर’ (प्रथम खबरी अहवाल) हा महत्त्वाचा दस्तऐवज आॅनलाईन पाहण्याची, डाऊनलोड करण्याची व प्रिंटआऊट काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यायची किंवा नाही

'FIR' will be available online? | ‘एफआयआर’ आॅनलाईन उपलब्ध होणार?

‘एफआयआर’ आॅनलाईन उपलब्ध होणार?

नागपूर : ‘एफआयआर’ (प्रथम खबरी अहवाल) हा महत्त्वाचा दस्तऐवज आॅनलाईन पाहण्याची, डाऊनलोड करण्याची व प्रिंटआऊट काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यायची किंवा नाही यावर १० आठवड्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी मंगळवारी दिलेत.
या विषयावर दिल्ली उच्च न्यायालयाचाही एक निर्णय आहे. या निर्णयात ‘एफआयआर’ची प्रत आॅनलाईन उपलब्ध करून देता येऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, संवेदनशील प्रकरणांतील ‘एफआयआर’ सार्वजनिक होऊ नये यासाठी प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी समिती स्थापन करणे आवश्यक असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे गृहविभागाचे सचिवांना पाठवावीत आणि शासनाने धोरणात्मक निर्णय घेताना या बाबी विचारात घ्याव्यात, असे नागपूर खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जवळपास सर्वच व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. एका क्लीकवर हवे ते उपलब्ध होते. परंतु, ‘एफआयआर’सारखा महत्त्वाचा दस्तऐवज आजही ‘आॅनलाईन’ पाहता येत नाही. ‘एफआयआर’ची प्रत मिळविण्यासाठी पोलीस ठाण्याच्या खेटा घालाव्या लागतात किंवा पोलिसांचे हात ओले करावे लागतात. ही बाब लक्षात घेता डॉ.जयकुमार दीक्षित यांनी ‘एफआयआर’ची प्रत आॅनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे, तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: 'FIR' will be available online?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.