नागपूरमध्ये पद्मेश गुप्ता यांच्याविरुद्ध एफआयआर
By Admin | Updated: March 21, 2015 01:35 IST2015-03-21T01:35:35+5:302015-03-21T01:35:35+5:30
कोळसा खाण पट्टे वाटप प्रकरणात सीबीआयने नागपुरातील कोळसा व्यापारी पद्मेश गुप्ता यांच्याविरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी कटाबाबत एफआयआर दाखल केला आहे.

नागपूरमध्ये पद्मेश गुप्ता यांच्याविरुद्ध एफआयआर
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कोळसा खाण पट्टे वाटप प्रकरणात सीबीआयने नागपुरातील कोळसा व्यापारी पद्मेश गुप्ता यांच्याविरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी कटाबाबत एफआयआर दाखल केला आहे. एकूणच या प्रकरणातील हा ३९ वा एफआयआर आहे.
गुप्ता यांची गुप्ता ग्लोबल रिसोर्सेस प्रा.लि. ही कंपनी कोल वॉशिंग व्यवसायाशी संबंधित आहे. सीबीआयने त्यांच्या नागपूर येथील कार्यालयाबरोबर बेंगलुरू, कोलकाता, नवी दिल्ली येथेही छापे टाकून महत्त्वपूर्ण दस्तावेज हस्तगत केले. कंपनीवर आरोप आहे की, कोळसा मंत्रालयाच्या निकषाकडे दुर्लक्ष करून दुय्यम दर्जाच्या कोळशाची विक्री मंत्रालयाची परवानगी न घेता केली होती. वीज उत्पादन क्षेत्रात कार्यरत अनेक कंपन्यांनी गुप्ता यांच्या कंपनीवर दुय्यम दर्जाचा कोळसा पुरवत असल्याचा आरोप केला आहे. याच कारणामुळे, महाजनकोने कंपनीशी व्यवहार बंद केला आहे. गुप्ता यांच्या कंपनीला कर्नाटक सरकारच्या कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लि.कडून कोल वॉशिंगची आॅर्डर मिळाली होता. (प्रतिनिधी)
महाजनकोची तक्रार
महाजनकोने कोल वॉशिंगच्या संदर्भातील तक्रार गुप्ता ग्लोबलच्या विरोधात राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे.
काय आहे ‘अस्वीकृत’ कोळसा
कोळशाच्या धुलाईमुळे राख कमी होते. या प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणात ‘अस्वीकृत’ कोळसा तयार होतो. ज्याच्या वापरावर कोळसा मंत्रालयाचे कडक निर्देश आहेत.