चित्रपट निर्माते पुनमिया यांच्याविरुद्ध एफआयआर
By Admin | Updated: October 8, 2016 01:09 IST2016-10-08T01:09:41+5:302016-10-08T01:09:41+5:30
जुन्या व्यवसाय भागीदाराने फसवणूक आणि बनावट कागदपत्रे दाखल केल्याच्या तक्रारीच्या आधारे प्रथमदर्शनी अहवाल दाखल करण्यात आला

चित्रपट निर्माते पुनमिया यांच्याविरुद्ध एफआयआर
मुंबई : हिंदी चित्रपट निर्माते संजय पुनमिया यांच्याविरोधात एका जुन्या व्यवसाय भागीदाराने फसवणूक आणि बनावट कागदपत्रे दाखल केल्याच्या तक्रारीच्या आधारे प्रथमदर्शनी अहवाल दाखल करण्यात आला आहे. संजय पुनमिया हे यमला पगला दिवाना या चित्रपटाचे सहनिर्माते होते आणि गली गली में चोर है चित्रपटाचे ते निर्माते आहेत.
श्यामसुंदर अगरवाल या बिल्डरने २६ सप्टेंबर रोजी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून त्यात पुनमिया यांनी खोटारडेपणाने एका प्लॉटची नोंदणी केल्याचे म्हटले आहे. या प्लॉटची किंमत आता ४ कोटी रुपये आहे आणि २००७ मध्ये अगरवाल यांनी या प्लॉटसाठी पैसे दिले असले तरी पुनमिया यांनी तो स्वत: आणि स्वत:च्या मुलाच्या नावे केला आहे.
अगरवाल यांच्या तक्रारीनुसार पुनमिया व त्यांनी मिळून तिरुपती बालाजी एंटरप्रायझेस ही कंपनी स्थापन केली होती आणि सिन्नर येथील ६ एकराचा प्लॉट खरेदी केला. त्या वेळी प्लॉटची किंमत ४८ लाख रुपये होती. दोघांनी मिळून सुरुवातीला २० लाख रुपये अदा करण्याचे ठरविले आणि कंपनीतर्फे डिमांड ड्राफ्टने पैसे दिले.
मात्र पुनमिया यांनी २००८मध्येच या जागेसाठी स्वत:च्या आणि मुलाच्या नावाने सेल डीड केले. त्यांनी सेल डीडची जी पावती तयार केली होती त्यावर डिमांड ड्राफ्टचा जो नंबर नमूद केला होता तो सुरुवातीला तिरुपती एंटरप्राइजने १८ सप्टेंबर २००७ रोजी जो करारनामा केला होता, त्यावर नमूद केलेल्या ड्राफ्टचा होता. केवळ बँकेचे नाव बदलले गेले होते.
सिन्नर पोलीस पुनमिया यांच्या घरी चौकशीसाठी गेले होते. पण त्यांना अद्याप अटक झालेली नाही. राजकीय दबावामुळे ती अटक झाली नाही, असा अगरवाल यांचा आरोप आहे. यापूर्वी त्यांनी कुवेतच्या राजघराण्यातील व्यक्तींंशी २०१३ मध्ये केलेल्या ७० कोटी रुपये किमतीच्या मरीन ड्राइव्ह येथील अल सबाह इमारतीतील समुद्राकडे तोंड करून असलेल्या एका फ्लॅटच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)
>पुनमिया यांचा इन्कार
पुनमिया यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. हे सर्व आरोप खोटे आहेत. मी कंपनीतून पैसे उसने घेतले होते आणि पंधरा दिवसांत ते पुन्हा ठेवून दिले. एक भागीदार म्हणून मला तसे करण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.