आठ पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवा
By Admin | Updated: February 16, 2016 03:43 IST2016-02-16T03:43:11+5:302016-02-16T03:43:11+5:30
संदीप गदोली चकमक प्रकरणी गुडगावच्या आठ पोलिसांवर एफआयआर नोंदवण्याचा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला.

आठ पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवा
मुंबई : संदीप गदोली चकमक प्रकरणी गुडगावच्या आठ पोलिसांवर एफआयआर नोंदवण्याचा आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनी नेमलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) या प्रकरणाचा तपास
सोपविला.
गुडगावच्या संदीप गदोली याचा भाऊ कुलदीप याने गुडगाव पोलिसांनी बनावट चकमक दाखवून भावाची हत्या केल्याचा आरोप याचिकेद्वारे केला आहे. गुडगाववरून मुंबईत आलेल्या आठही पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात यावा व त्यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुलदीप गदोली यांनी याचिकेद्वारे केली आहे.
प्रतिस्पर्धी व्यावसायिकाने संदीपच्या हत्येसाठी गुडगाव पोलिसांना पाच कोटी रुपयांची सुपारी दिली. अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या हॉटेल एअरपोर्ट मेट्रोमध्ये ७ फेब्रुवारी रोजी त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्याला शरण येण्याची संधीच दिली नाही. तसेच स्थानिक पोलिसांना त्याची कल्पनाही दिली नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
खंडपीठाने मुंबई पोलिसांना याचिकाकर्त्याची तक्रार नोंदवून आठ पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला. दोन परस्परविरोधी एफआयआरवर एसआयटी तपास करू शकते, असे म्हणत खंडपीठाने आठ पोलिसांविरुद्ध सोमवारी एफआयआर नोंदवण्याचा आदेश पोलिसांना दिला.
(प्रतिनिधी)