कंपनीचे रेकॉर्ड चोरणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 2, 2017 02:13 IST2017-03-02T02:13:01+5:302017-03-02T02:13:01+5:30
क्युबिक इंडिया सोल्युशन एलएलपी, सुनील सुराणा, रवी वर्मा आणि रमाकांत त्रिपाठी या आरोपींविरुद्ध सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला

कंपनीचे रेकॉर्ड चोरणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : आपण काम करीत असलेल्या कंपनीच्या रेकॉर्डमधील महत्त्वपूर्ण माहिती चोरल्याच्या आरोपावरून, बीकेसी पोलिसांनी क्युबिक इंडिया सोल्युशन एलएलपी, सुनील सुराणा, रवी वर्मा आणि रमाकांत त्रिपाठी या आरोपींविरुद्ध सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर दाखल होण्यापूर्वी तक्रारदार कंपनी भुटोरिया रेफ्रिजरेशन प्रा. लि.ने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, हा गुन्हा सायबर कायद्यांतर्गत मोडत असल्याने, गोरेगाव पोलिसांनी तक्रारदाराला सायबर शाखेशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, कामाचा ताण असल्याचे कारण देत तब्बल एक वर्ष गुन्हा दाखल करण्याचे टाळण्यात आले.
भुटोरिया रेफ्रिजरेशन कंपनी फिर्यादी अशोक भुटोरिया यांच्या मालकीची असून, त्यात यातील गुन्हा दाखल केलेले इसम मोठ्या पदावर काम करीत होते. भुटोरिया यांच्या कंपनीचा विश्वासघात करून लॅपटॉप, ईमेल आदींच्या साहाय्याने कंपनाचा महत्त्वाचा डाटा, पुरवठादार कंपन्यांची माहिती, ग्राहकांची माहिती, कन्सल्टंट आदींची माहिती चोरली. त्यात दोन हजार पुरवठादार आणि खरेदीदारांचा तपशील होता. त्याचा दुरुपयोग केल्याने आपले ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे भुटोरिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आरोपींनी सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. (प्रतिनिधी)