मच्छिमारांवरील दंड माफ होणार
By Admin | Updated: April 8, 2015 23:35 IST2015-04-08T23:35:03+5:302015-04-08T23:35:03+5:30
ससून डॉक गोडाऊनच्या भाड्यापोटी आकारलेल्या व्याज, दंडाबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मच्छिमारांना दिलासा दिला आहे.

मच्छिमारांवरील दंड माफ होणार
मुंबई : ससून डॉक गोडाऊनच्या भाड्यापोटी आकारलेल्या व्याज, दंडाबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मच्छिमारांना दिलासा दिला आहे. मच्छिमारांना या भाड्यावर आकारलेले व्याज आणि त्यावरील दंड माफ करण्यासाठी लवकरच केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याची ग्वाही खडसे यांनी विधानसभेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. ससून डॉक बंदरावर मच्छिमारांना गोडाऊन्स देण्यात आलेले आहेत. या गोडाऊन्सचे भाडे मच्छिमारांनी एमएफडीसीला भरले आहे; परंतु एमएफडीसीने हे भाडे मुंबई पोर्ट ट्रस्टला भरले नसल्याने हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सरकार हे भाडे भरणार का, असा सवाल वळसे-पाटील यांनी केला. ससून डॉकच्या गोडाऊनचे भाडे भरण्यात आले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने या निणर्याचे पालन करण्यास सांगितले असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. मच्छिमारांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. परंतु त्याबाबत केंद्रिय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मच्छिमारांची बाजू न्यायालयात मांडणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन या समस्येवर तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोडाऊनची जमीन सीआरझेडमध्से येत असल्याने त्यावर कुणाची नजर नसल्याचे सांगतानाच सरकार मच्छिमारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे खडसे म्हणाले. तसेच रेडिरेकनरप्रमाणे आकारले जाणारे गोडाऊनचे भाडे खूपच आहे. मात्र, हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येत असलयाने त्याबाबतचाही प्रश्न केंद्राकडे मांडू, असे आश्वासन दिले.