खुनामागील मास्टरमाइंड शोधा
By Admin | Updated: September 18, 2015 00:43 IST2015-09-18T00:43:14+5:302015-09-18T00:43:14+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी पक डले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमाइंड

खुनामागील मास्टरमाइंड शोधा
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी पकडले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमाइंड शोधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सनातन्यांच्या मास्टरमाइंडची चौकशी व्हावी, या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्मिता पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
पानसरे म्हणाल्या, या खुनामागे सनातनी शक्ती असल्याचे सर्व पुरोगामी संघटनांनी वारंवार ठासून सांगितले होते; पण पानसरेंची हत्या ही टोल, बांधकाम कामगार संघटनेतील वाद आणि मालमत्तेच्या वादावरून झाल्याचा प्रसार करण्यात आला. पोलीसही त्याच पद्धतीने तपास करीत होते.
अखेर आमचा रोख खरा ठरला आहे. पोलीस किमान संशयिताला अटक करण्यात का असेना, पण यशस्वी झाले आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणातील सनातन्यांच्या मास्टरमाइंडला शोधण्याच्या दृष्टीने राजकीय दबावाला बळी न पडता तपास करावा, अशी अपेक्षाही स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
हिंदुत्ववाद्यांनी कोणाचे हित केले ?
हिंदुत्वाचे रक्षण करण्याचा आव आणणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना या मूठभरांचे हित साधत आहेत. या धर्मातील तळागाळातील लोकांची उन्नती करण्यासाठी या संघटनांनी काय केले आहे, याचा विचार आता सर्वसामान्य हिंदू नागरिकांनीच करावा, असे आवाहनही स्मिता पानसरे यांनी केले.
मुख्यमंत्री मौन का?
पोलिसांनी पकडलेला संशयित समीर गायकवाड हा सनातनी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झालेले आहे, पण तरीही सनातन्यांची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौन का बाळगून आहेत, असा सवालही स्मिता पानसरे यांनी केला.