अखेर सुधागड शाळेवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 23, 2016 02:55 IST2016-07-23T02:55:47+5:302016-07-23T02:55:47+5:30
कळंबोलीतील विद्यार्थिनीने अकरावीत प्रवेश न मिळाल्याने नैराश्येच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

अखेर सुधागड शाळेवर गुन्हा दाखल
कळंबोली/तळोजा : कळंबोलीतील विद्यार्थिनीने अकरावीत प्रवेश न मिळाल्याने नैराश्येच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याबरोबरच, शासकीय नियमांचे उल्लंघन, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री पोलिसांनी सुधागड संस्थेवर फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला.
पुष्पा सूर्यवंशी या विद्यार्थिनीला दहावीला ८२ टक्के गुण मिळाले आहे. मात्र कटआॅफ लिस्ट ८६ टक्क्यांना बंद झाल्याने तिला प्रवेश मिळाला नाही. व्यवस्थापकीय कोट्यातून प्रवेश देण्यासाठी पुष्पाच्या नातेवाइकांकडून सुधागड संस्थेने २० हजार रु पये आकारले होते. कायद्याने आॅफलाइन प्रवेश बेकायदेशीरपणे असताना १५ हून अधिक विद्यार्थ्यांकडून अधिक पैसे आकारल्यावर नंतर ते परत करण्यात आले. त्यामुळे आपल्याला प्रवेश मिळणार नसल्याने पुष्पाला नैराश्य आल्याने तिने आत्महत्येचे निर्णय घेतल्याचे उघड होत आहे.
शाळेने अगोदर पैसे घ्यायचे नव्हते आणि पैसे घेतले तर मुलांना प्रवेश द्यायला हवा होता. पैसे परत केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वेगळा संदेश गेला आणि त्यानेच पुष्पाचा बळी घेतल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
याबाबत शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका सरचिटणीस अशोक मोटे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष रवी पाटील, युवा मोर्चेचे अमर पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात धडक देत शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. शुक्रवारी सुधागड एज्युकेशनच्या दोनही शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
>विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून त्याकरिता शाळा व्यवस्थापनाला बोलाविण्यात आले आहे. तसेच शिक्षण विभागाकडून या प्रकाराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. चौकशीअंती दोषी आढळण्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
- कोंडीराम पोपरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली
>शाळेची दुकानदारी
सुधागड एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्र ारी गेल्या वर्षापासून येत आहेत. यंदा आॅफलाइन प्रवेश बंद असतानाही प्रवेशाच्या नावे शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर येत आहे.