अखेर हार्बरवर धावली बारा डबा लोकल

By Admin | Updated: April 30, 2016 02:18 IST2016-04-30T02:18:44+5:302016-04-30T02:18:44+5:30

हार्बर मार्गावर बारा डब्यांची लोकल धावणार कधी, असा सवाल उपस्थित करणाऱ्या हार्बरवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली

Finally, the 12-coach local trains ran on Harbor | अखेर हार्बरवर धावली बारा डबा लोकल

अखेर हार्बरवर धावली बारा डबा लोकल

मुंबई : हार्बर मार्गावर बारा डब्यांची लोकल धावणार कधी, असा सवाल उपस्थित करणाऱ्या हार्बरवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली आणि शुक्रवारपासून (२९ एप्रिल) ही लोकल धावण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी पहिली बारा डब्यांची लोकल पहाटे सहाच्या सुमारास वाशी ते वडाळा धावली आणि चार डब्यांपासून बारा डब्यांपर्यंतचा प्रवास हार्बरने पूर्ण केला. या लोकलमुळे प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता ही ३३ टक्क्यांनी वाढणार आहे.
भारतातील पहिली प्रवासी रेल्वे २२ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली आणि यानंतर मुंबई उपनगरीय रेल्वेचा विकास टप्प्याटप्प्याने होत गेला. मेन लाइनवर पहिली लोकल धावल्यानंतर हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला अशी चार डब्यांची लोकल १९२५ साली धावली आणि त्यानंतर हार्बर रेल्वेनेही कात टाकण्यास सुरुवात केली. हार्बर मार्गावर आठ डब्यांची लोकल सुरू करण्यासही जादा काळ लागला नाही. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढत गेली. एकीकडे बरोबरीने मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील लोकलचे डबेही वाढविण्याचे काम केले जात होते. हार्बरवर नऊ डब्यांची लोकल धावण्यास १९६३ साल उजाडले. परंतु त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मेन लाइनवरच लक्ष केंद्रित करण्यात आले आणि हार्बर रेल्वे ही दुर्लक्षितच राहिली. १९८६ साली मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर पहिली बारा डब्यांची लोकल धावल्यानंतर या मार्गावर सर्व लोकल बारा डब्यांच्या करण्यास २५ वर्र्षे लागली. यानंतर हार्बर मार्गावरही अशी लोकल त्वरित सुरू होणे अपेक्षित असतानाच त्याला लेटमार्कच लागत गेला.
२00९-१0 साली हार्बरवरील बारा डब्यांसाठी लोकल प्रकल्पाचे काम सुरू झाले असतानाच हे काम डिसेंबर २0१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या प्रकल्पाला दीड वर्ष विलंब झाला. हार्बरवरील बारा डब्यांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे काम हे सीएसटी स्थानकात होते. ते काम ७२ तासांत पूर्ण केले. तरीही वडाळा येथे मोटरमनला सिग्नल पाहण्यात होत असलेला अडथळा आणि डॉकयार्ड रोड स्थानकात प्लॅटफॉर्मची बाकी असलेली लांबी व उंची यामुळे काम आणखी रखडले होते. परंतु हे काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन देत ते मार्गी लावण्यात आले. (प्रतिनिधी)
प्रवाशांना कल्पना दिलीच नाही
शुक्रवारपासून बारा डब्यांच्या लोकलच्या १४ फेऱ्या झाल्या. या फेऱ्या होताना ही बारा डब्यांची लोकल असल्याची कोणतीही उद्घोषणा हार्बर स्थानकांवर होत नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांची तारांबळ उडत होती.
याबाबत रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिवसभरात चौदा लोकल फेऱ्या झाल्या आणि त्यात कोणताही अडथळा आला नाही. आणखी बारा डब्यांच्या लोकल लवकरच चालविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Finally, the 12-coach local trains ran on Harbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.