एसी डबल डेकर ‘स्पेशल’ ट्रेन चालवण्यावर भर
By Admin | Updated: December 26, 2014 04:25 IST2014-12-26T04:25:13+5:302014-12-26T04:25:13+5:30
कोकण मार्गावरील एसी डबल डेकर ट्रेन सुरुवातीला स्पेशल म्हणून धावल्यावर यापुढे ती ट्रेन नियमित म्हणून न चालवता फक्त ‘स्पेशल’ म्हणूनच चालवण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात येत आहे

एसी डबल डेकर ‘स्पेशल’ ट्रेन चालवण्यावर भर
मुंबई : कोकण मार्गावरील एसी डबल डेकर ट्रेन सुरुवातीला स्पेशल म्हणून धावल्यावर यापुढे ती ट्रेन नियमित म्हणून न चालवता फक्त ‘स्पेशल’ म्हणूनच चालवण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात येत आहे. त्यामुळे कोकणवासीयांना गर्दीच्या वेळेतच ती नजरेस पडेल, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी ही ट्रेन दक्षिण विभागातही चालवण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बारा डब्यांची असलेली एसी डबल डेकर ट्रेन यापूर्वी पूर्व मध्य विभागात भोपाळ-इंदौर मार्गावर धावत होती. मात्र कोकण मार्गावर पहिल्यांदा एसी डबल डेकर ट्रेन सुरू करीत असल्याचे सांगत गणेशोत्सवात ट्रेन सुरू करण्याला मुहूर्त दिला. कुठलेही नियोजन न करता प्रिमियम म्हणून ट्रेन चालवल्यावर त्याकडे कोकणवासीयांनी पाठ फिरवली. दिवाळीत पुन्हा नॉन प्रिमियम म्हणून चालवल्यावर त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. पण या दोन्ही गर्दीच्या काळात ट्रेन चालवताना ती स्पेशल म्हणूनच मध्य रेल्वेकडून चालवली. गणेशोत्सवामध्ये एसी डबल डेकर ट्रेन चालवण्यासाठी मध्य रेल्वेने घाईघाईने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून स्पेशल ट्रेन म्हणून परवानगी घेत ही ट्रेन चालवली. मात्र त्यानंतर या ट्रेनला नियमित म्हणून चालवण्यासाठी कुठलेही प्रयत्न मध्य रेल्वेकडून केले नाहीत. उलट ही ट्रेन आता हिवाळी सुट्टीतही न चालवता थेट लोअर परेल वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डबल डेकर ट्रेन काही दिवसांतच वर्कशॉपमध्ये गेल्यानंतर एक ते सव्वा महिना तेथे मुक्काम करावा लागेल. याबाबत मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांना विचारले असता, एसी डबल डेकर ट्रेन सुरुवातीला स्पेशल म्हणून धावली. ही ट्रेन नियमित म्हणूनही धावू शकते. मात्र त्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रस्ताव येणे आवश्यक आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून विचारणा झालेली नाही की प्रस्तावही आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)