शालेय पोषण आहारात डाळींवर भर!
By Admin | Updated: July 13, 2016 01:28 IST2016-07-13T01:28:40+5:302016-07-13T01:28:40+5:30
आहाराच्या मेन्यू कार्डात बदल क रून तूर डाळीचा पुन्हा आंतर्भाव केला जाणार आहे.

शालेय पोषण आहारात डाळींवर भर!
ब्रम्हानंद जाधव/ बुलडाणा
भाववाढीमुळे शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शालेय पोषण आहारामधून गायब झालेली तुरडाळ यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून पूर्ववत देण्यात येणार आहे.
इयत्ता पहिल्या ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार मिळावा, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केलेली आहे. शालेय पोषण आहारासाठी लागणारे साहित्य शासनाकडून पुरविल्या जाते, तसेच इतर साहित्यासाठी प्रति विद्यार्थी रोख अनुदानही दिल्या जाते; परंतु शासनाकडून इतर साहित्यासाठी दिले जाणारे अनुदान कमी पडत असल्यास पोषण आहारातील महागलेले साहित्य बंद करून त्याठिकाणी पर्यायी साहित्य वापरले जात असल्याचा प्रकार गतवर्षी पाहावयास मिळाला. गेल्यावर्षी तूर डाळीचे भाव अचानक वाढल्याने सर्वसामान्यांपासून ते विद्यार्थ्यांंच्या ताटातले वरण गायब झाले होते. शालेय पोषण आहारात तूर डाळीऐवजी इतर डाळी वापरण्यात येत होत्या. विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत या चालू शैक्षणिक सत्रात यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला असून गतवर्षी भाववाढीमुळे बंद झालेली तूर डाळ सुरू करण्यात येणार आहे, तसेच नवीन शैक्षणिक सत्रातील शालेय पोषण आहाराच्या मेन्यू कार्डात बदल झाला असून, त्यामध्ये मूग डाळ, मसुर डाळ, तूर डाळ, हरभरा आदी डाळींवर भर देण्यात आला आहे. सोमवार ते शनिवारचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे; तसेच शासनाच्यावतीने राज्यभरातील जिल्हा परिषदमधील शालेय पोषण आहार विभागाकडे पोषण आहारातील साहित्याचे नवीन दरपत्रक पाठविण्यात आले आहे. त्यानुसार शालेय पोषण आहारासाठी अनुदान देण्यात येणार आहे, तसेच आलेल्या दरपत्रकाप्रमाणे पोषण आहारातील साहित्य खरेदी करावे लागणार आहे.
पोषण आहारातील साहित्याचे नवीन दर
जि.प.च्या शालेय पोषण आहार विभागाकडे २0१६-१७ या नवीन शैक्षणिक सत्रासाठी शासनाने पोषण आहारातील साहित्याचे नवीन दरपत्रक पाठविले आहे. त्यामध्ये मूग डाळ १0८ रुपये किलो, मसुर डाळ ९४ रुपये, तूर डाळ १५४ रुपये, हरभरा ६७ रुपये, चवळी ६५, मटकी ९४, मूग ९७, वाटाणा ६३, तेल ९९ रुपये प्रतिलिटर, कांदा, लसूण मसाला १९१ रुपये, हळद पावडर २0५ रुपये, मीठ ११ रुपये, जिरे १९0 रुपये, मोहरी ७४ रुपये, मिरची पावडर १९१ रुपये, गरम मसाला १९१ रुपये, तांदूळ वाहतूक खर्च प्रतिकिलो १.२0 रुपये दर देण्यात आले आहेत.