डोळे भरून ‘त्या’ तान्हुल्याकडे पाहत होत्या
By Admin | Updated: August 1, 2014 04:00 IST2014-08-01T04:00:20+5:302014-08-01T04:00:20+5:30
निसर्गाच्या प्रकोपातही माळीण गावातील एक महिला व तिचे तीन महिन्यांचे बालक चमत्कारीकरीत्या बचावले असून त्यांच्यासह ५ जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

डोळे भरून ‘त्या’ तान्हुल्याकडे पाहत होत्या
मंचर (जि. पुणे) : निसर्गाच्या प्रकोपातही माळीण गावातील एक महिला व तिचे तीन महिन्यांचे बालक चमत्कारीकरीत्या बचावले असून त्यांच्यासह ५ जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
रुद्र असे या बालकाचे नाव असून त्याच्या पायाला खरचटले आहे. त्याची आई प्रमिला मच्छिंद्र लेंभे हिची पाठ आणि खांदा दुखावला आहे़ डोळे भरून ती आपल्या तान्हुल्याकडे पाहत होत्या़
या दुर्घटनेबद्दल प्रमिला म्हणाली, अचानक वीज कडाडल्यासारखा आवाज होऊन कौले पडली़ बाळाला डाव्या बाजूला घेऊन मी पळत घराबाहेर चालले होते, तोच माझ्या उजव्या बाजूची भिंत अंगावर पडली. मी बाळासकट खाली पडले़ माझ्या पाठीवर जड लाकडांचा भार होता. पाय ढिगाऱ्याखाली होते, एक हात मोकळा होता़ मी हळूहळू दोन्ही पाय सोडवून घेतले. बाळाला पायांवर ठेवले. मी खाली पडल्यापासून आरडाओरडा करत होते; पण तो कोणालाही ऐकू जात नव्हता़ पत्रा समोर आडवा होता, मी बसून राहिले असताना बाहेर आवाज ऐकू आला, त्या वेळी बाळाने रडणे सुरू केले. ते ऐकून काही तरुण आत आले. त्यांनी माझी अन् बाळाची सुटका केली. सकाळी ८ पासून दुपारी साडेचारपर्यंत आपण असहाय अवस्थेत अडकून पडलो होतो, असे सांगून प्रमिलाने सांगितले़