सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड मार्गावर स्थानकाची भर
By Admin | Updated: June 9, 2016 06:14 IST2016-06-09T06:14:33+5:302016-06-09T06:14:33+5:30
सीएसटी ते पनवेल या एलिव्हेटेड मार्गावर एका नविन स्थानकाची भर पडणार आहे.

सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड मार्गावर स्थानकाची भर
मुंबई : सीएसटी ते पनवेल या एलिव्हेटेड मार्गावर एका नविन स्थानकाची भर पडणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मार्गावरुन हा प्रकल्प जाणार असून त्यामध्येच हे नविन स्थानक स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे अकरा स्थानकांच्या यादीत आणखी एका नविन स्थानकाची भर पडेल.
सीएसटी ते पनवेल असा एलिव्हेटेड (उन्नत) मार्ग तयार केला जाणार असून त्यासाठी साधारपणे ११ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च आहे. या प्रकल्पाचा काहीसा भाग हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेतून जाणार आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून केले जाणार असून त्याची लांबी ४७ किलोमीटर एवढी आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनींचा पुनर्विकास करण्याची योजना आहे आणि या योजनेत जलक्रिडा, मनोरंजनपर गोष्टी तसेच मोकळ्या जागेचा समावेश आहे. या अनुषंगाने पुनर्विकास करण्याची योजना झाल्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देण्याची शक्यता असल्याने नविन स्थानक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नविन स्टेशन इंडिया डॉक्सच्या जवळ उभारले जाण्याची शक्यता असून एकच स्थानक उभारले जाईल. त्यामुळे अकरा स्थानकांच्या यादीत आणखी एका स्थानकाची भर पडेल. महत्वाची बाब म्हणजे या नियोजित प्रकल्पात काही प्रमाणात बदल करण्यात येणार असून हा मार्ग मेन्शन मार्गावरुन जाईल. यापूर्वीचा मार्ग पी.डिमेलो मार्गावरुन नेण्यात येणार होता, अशी माहीती सूत्रांकडून देण्यात आली. सीएसटीकडील अठरा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरुन मेन्शन मार्ग आणि तिथून रे रोडवरुन एलिव्हेटेड मार्ग जाणार आहे.