जालना ड्रायपोर्टसाठी जमिनीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: November 11, 2015 02:41 IST2015-11-11T02:41:27+5:302015-11-11T02:41:27+5:30
जालना येथील प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे

जालना ड्रायपोर्टसाठी जमिनीचा मार्ग मोकळा
विकास राऊत, औरंगाबाद
जालना येथील प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.
सुमारे ५०० एकर जमिनीवर १,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारणाऱ्या या प्रकल्पाचा मूळ उद्देश मराठवाड्यातील आयात-निर्यातीला चालना मिळणे हा आहे. या वेळी खा. रावसाहेब दानवे, जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, जेएनपीटीचे विश्वस्त विवेक देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, गोपाल चटर्जी, जालना जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक उपस्थित होते.
‘ज्या ठिकाणी ड्रायपोर्ट प्रस्तावित आहे ती जागा शासकीय आहे. १०८ हेक्टर जमीन शासनाकडे होती. ५३ हेक्टर जमीन सरकारी धोरणानुसार वाटप झालेली आहे. ती जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जमिनीची किंमत ८५ कोटींपर्यंत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमार्फत ही प्रक्रिया पूर्ण होईल. जमिनीचा प्रश्न मार्गी लागल्यात जमा असून, नोव्हेंबरनंतर पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे. ३० नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल,’ असे विवेक देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.