मटका आकडे छापणाऱ्या सहा दैनिकांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: March 31, 2017 22:39 IST2017-03-31T22:24:01+5:302017-03-31T22:39:22+5:30
सोलापुरातील सहा दैनिके आणि त्यांच्या संपादकांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला

मटका आकडे छापणाऱ्या सहा दैनिकांवर गुन्हे दाखल
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 31 - मटका आकडे छापून जुगार खेळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सोलापुरातील सहा दैनिके आणि त्यांच्या संपादकांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुराज दिलीप पोरे (वय 34, रा.नीलम नगर, बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. दैनिक संचार, सुराज्य, केसरी, दैनिक जनप्रवास, तरुण भारत अशी गुन्हा दाखल झालेल्या दैनिकांची नावे आहेत. या दैनिकांनी मुंबई आणि कल्याण मटक्याचे आकडे छापून नागरिकांना मटका खेळण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास फौजदार डी. बी. लिगाडे करीत आहेत.
तत्पूर्वी मटक्याचे आकडे छापणाऱ्या दैनिक तरुण भारत व दैनिक पुढारी या गोव्यातील वृत्तपत्रांना गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) गुरुवारी नोटीस बजावून लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने 31 आॅगस्ट 2016ला दिलेल्या आदेशानुसार, राजरोसपणे मटका चालविणाऱ्या 1100 बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या पुढारी व तरुण भारत या वृत्तपत्रांवर पोलिसांनी 8 आॅक्टोबर रोजी गुन्हे दाखल केले आहेत.
(‘दैनिक पुढारी’ आणि ‘तरुण भारत’ला नोटीस)
गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, त्या अनुषंगाने पहिली नोटीस गोव्यातील या वृत्तपत्रांना पाठविण्यात आली आहे. दोन्ही वृत्तपत्रांना विशिष्ट कागदपत्रे सादर करण्यासही सांगितले आहे. गरज पडल्यास वृत्तपत्रांच्या कार्यालयात झडती घेण्याचीही शक्यता या विभागातर्फे व्यक्त करण्यात आली.