फिल्डींग लावण्यात गेली ‘कत्तल की रात’
By Admin | Updated: October 15, 2014 01:41 IST2014-10-15T01:41:28+5:302014-10-15T01:41:28+5:30
मंगळवारच्या रात्री वसाहतींमधील मुख्य चौक, प्रचार कार्यालयांमधील गर्दी कमी होण्यापेक्षा वाढतच चालली होती. झोपडपट्ट्यांकडे अनेक जण लक्ष ठेवून होते. आपला पट्टा (घरे) सांभाळ, म्हणणारे येत होते,

फिल्डींग लावण्यात गेली ‘कत्तल की रात’
‘अलर्ट’मुळे रात्रीची कामे झाली दिवसाच : झोपडपट्ट्यांमध्ये होती रात्री उशिरापर्यंत वर्दळ
नागपूर : मंगळवारच्या रात्री वसाहतींमधील मुख्य चौक, प्रचार कार्यालयांमधील गर्दी कमी होण्यापेक्षा वाढतच चालली होती. झोपडपट्ट्यांकडे अनेक जण लक्ष ठेवून होते. आपला पट्टा (घरे) सांभाळ, म्हणणारे येत होते, जात होते. ‘अलर्ट’मुळे कत्तलच्या रात्रीची कामे दिवसाच झाली होती. तरीही काही ठिकाणी पैशाचे पुडके देणारे, दारूच्या पेट़्या उतरविणारे, चिवड्यांचे पॅकेट्स, मतदार याद्या पोहचविण्याचे काम बिनबोभाट सुरू होते. जात, पैसा, दारू, दहशत या सर्वांचा वापर या रात्री होताना दिसत होता. समोरच्या उमेदवाराची ‘फिल्डींग’ लावण्यासाठी आराखडे तयार केले जात होते. मोबाईलवरून भराभर सूचना दिल्या जात होत्या. मुख्य रस्त्यावर वाहनांची कसून तपासणी होत असली तरी कार, मोटारसायकलमधून माणसे येत होती, जात होती. बंद दरवाज्याच्या आड ती गुडूप होत होती. शहराचे हे विविध भागाचे चित्र ‘लोकमत’च्या चमूने रात्री उशिरापर्यंत टिपले. मंगळवारची रात्र ‘कत्तल की रात’ ठरली.
पूर्व नागपूर
पूर्व नागपुरातील एका झोपडपट्टीमध्ये बिर्याणीचे पुडके वाटले जात होते. काही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात दुसऱ्या दिवशीची कामे सुरू होती. काही ठिकाणी जेवणाबरोबर कार्यकर्त्यांच्या ‘चुहा बैठकी’ सुरू होत्या. गल्लीमध्ये कार्यकर्ते गटागटाने उभे होते. कार्यकर्त्यांचा गराडा बघून पोलिसांचे राऊंड सुरू होते. पोलिसांची गाडी गेल्यावर कार्यकर्त्यांच्या पुन्हा हालचालींना वेग येत होता. मुख्य रस्त्याच्या डिव्हायडरवर काही कार्यकर्ते ठाण मांडून होते. येणाऱ्या-जाणाऱ्यावर पाळत ठेवून मोबाईलवर सूचना देत होते. खरबी चौकात दोन-तीन आॅटोमधून सावधगिरीने काही तरी वितरित होत होते. एका पक्षाच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी होती. एकूणच प्रचार आणि आपल्या बाजूने कसे वातावरण तयार झाले आहे, याची चर्चा रंगली होती. मतदान आपल्याच बाजूने कसे होईल, लोकांना आपल्याच बाजूने मतदान करण्यासाठी शेवटपर्यंत कसे वळवता येईल, याचेच ठोकताळे बांधल्या जात होते.
दक्षिण नागपूर
दक्षिण नागपुरात झोपडपट्ट्यांची संख्या फार जास्त नाही, मात्र दाटीवटीच्या वसाहतींच्या चौकाचौकांमधील मतदान केंद्राच्या १०० फुटावर लावलेल्या विविध पक्षांच्या काही बुथमध्ये चर्चा रंगली होती. या चर्चेत जुनी माणसे उठत होती नवीन माणसे जुळत होती. सर्वच जण मोबाईलशी जुळले होते. वसाहतींमध्ये नेमून दिलेली माणसे डोळ्यात तेल घालून फिरताना दिसत होती. एखादे वाहन वसाहतीच्या आत शिरताना पाहून त्याच्या मागे जात होती. तणावाचे वातावरण असले तरी शांतता होती. क्रीडा चौकपासून ते मानेवाडा चौकपर्यंत सारेच मुख्य चौक जागे होते. काही स्थानिक उमेदवारांच्या घराच्या गच्चीवर मेजवान्या सुरू होत्या.
पश्चिम नागपूर
पश्चिम नागपूर क्षेत्रात पॉश वसाहतींसोबतच झोपडपट्ट्यांचा भरणाही मोठा आहे. मंगळवारच्या रात्री मुख्य कार्यकर्त्यांच्या घरांसमोर वाहनांची गर्दी होती, इतरत्र मात्र शांतता होती. झोपडपट्ट्या मात्र जाग्या होत्या. सुदामनगरी, पांढराबोडी, भिवसनखोरी, गंगानगर, हजारी पहाड, अजयनगर यात वर्दळ होती. विशेषत: भिवसनखोरीला जत्रे सारखे स्वरुप आले होते. वसाहतीच्या नाक्या-नाक्यावर गर्दी होती. यात अर्धेअधिक जण दारूच्या नशेत असल्याचे दिसून येत होते. विशिष्ट घरांसमोर जेवणासाठी काही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या झोपडपट्ट्यांवर अनेकांची नजर होती, यामुळे तणावाचे वातावरण होते. माणसे तपासली जात होती, त्याचा मागोवा घेतला जात होता. ‘अलर्ट’मुळे रात्रीची कामे पहाटे व दिवसा झाल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले.
दक्षिण-पश्चिम
दक्षिण-पश्चिम क्षेत्रात झोपडपट्ट्यांची संख्या बऱ्या पैकी आहे. यातील अर्ध्याअधिक झोपडपट्ट्या मध्यरात्रीनंतरही जाग्या होत्या. अमूक एखादी गाडी एकाच्या घरी उभी राहताच लोक गाडीभोवती जमा होत होते. त्यातील दोन-तिघांना गाडीत घेऊन काही अंतरावर सोडत होते. काही गाडीतील माणसे थेट घरात शिरत होती. दार बंद होत होती. जाताना ‘अपना आदमी है, संभाल ले’ म्हणत जात होती. चौकातील प्रचार कार्यालये कार्यकर्त्यांनी फुल्ल होती. एका प्रचार कार्यालयात मतदानादिवशी दिल्या जाणाऱ्या नाश्त्यावरून वाद होत होता. एक जण पुरी-भाजी तर दुसरा समोस्यांवर अडून होता. काहीमध्ये बुथला कमी पैसे मिळाले म्हणून मोबाईलवर जोरजोरात बोलत होते. वसाहतींमध्ये शांतता असलीतरी पक्ष प्रमुखांच्या, स्वत:ला नेता म्हणून घेणाऱ्यांच्या घरातील गर्दी कमी झालेली नव्हती.
उत्तर नागपूर
मागील दोन दिवसांपासून या भागातील काही महत्त्वाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरांची तपासणी पोलिसांकडून झाल्याने कत्तलच्या रात्री यातील अनेकांची घरे लवकरच झोपी गेली होती. मुख्य कार्यकर्ता प्रचार कार्यालयात किंवा आपल्या विश्वासूकडे तळ ठोकून तेथूनच तो सूत्रे हलवित असल्याचे चित्र होते. या भागात रात्रीची कामे दिवसाच झाली. यामुळे रात्री फक्त भोजनाचा आणि गप्पागोष्टींचा कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू होता. झोपडपट्ट्यांमध्ये मात्र मोटारसायकलची घरघर सुरू होती. वसाहतीतील काही गुन्हेगारी वृत्तीचे लोकं, अमूक जणाच्या गच्चीवरून वसाहतीवर लक्ष ठेवून होते. काही निष्ठावंत कार्यकर्ते घराघरांत संपर्क साधून संवाद साधत असल्याचे दिसून आले. कामठी रोडवरील अनेक ‘दाभे’, काही लॉन्समध्ये ‘व्हेज-नॉनव्हेज’च्या पार्ट्या रंगल्या होत्या. या पार्ट्या फक्त विशिष्ट कुपन किंवा ओळख असलेल्या लोकांसाठीच होत्या.
मध्य नागपूर
शहरात सर्वात जास्त संवेदनशील मतदारसंघ असलेल्या मध्य नागपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर बरीच वर्दळ दिसून येत होती. विशेषत: मोमीनपुरा, गोळीबार चौक, टिमकी, तांडापेठ, मस्कासाथ, महाल या भागात रात्री उशिरापर्यंत ‘कत्तल की रात’ची चर्चा सुरू होती. निरनिराळे पानठेले, हॉटेल्स येथे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. काही विशिष्ट हॉटेल्समध्ये तर ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खास ‘डिनर’ सुरू होते. या मतदारसंघातील अ़नेक झोपडपट्ट्यांमध्ये नागरिक जागे असल्याचे दिसून येत होते. हंसापुरी, सैफी नगर, भानखेडा, बोरियापुरा, सिरसपेठ इत्यादी भागात काही वेळाकरिता काही नागरिक ग्रुपमध्ये फिरताना दिसून आले अन् काही क्षणातच ते वेगवेगळ्या गल्लीबोळांमध्ये विभागले गेले. ‘कत्तल की रात’मध्ये ‘लेनदेन’ची शक्यता पाहता पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सेंट्रल एव्हेन्यू, महाल, चिटणीस पार्क, गणेशपेठ, मोमीनपुरा या भागात पोलीसांचे विशेष लक्ष होते. गाड्यांची तपासणी करण्यात येत होती, तसेच कामाशिवाय फिरणाऱ्या तरुणांची चौकशी होत होती.