बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 4, 2015 04:41 IST2015-06-04T04:41:40+5:302015-06-04T04:41:40+5:30
मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला फ्लॅट नाकारणाऱ्या बिल्डर व त्याच्या कर्मचाऱ्याविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला फ्लॅट नाकारणाऱ्या बिल्डर व त्याच्या कर्मचाऱ्याविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
राजेश मेहता (४७) असे बिल्डरचे नाव आहे. धर्म, जात, भाषा पाहून घटनेने दिलेल्या अधिकारांपासून एखाद्याला वंचित ठेवणे, असा गुन्हा मेहतांविरोधात दाखल केल्याची माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद खेतले यांनी ‘लोकमत’ला दिली.
मेहता यांची श्रीनाथजी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. मालाड पश्चिमेकडे मेहता यांनी इमारत उभारली आहे. याच परिसरात राहणारे वैभव रहाटे ४ मे रोजी आपल्या मित्रासह मेहता यांच्या साइट आॅफीसमध्ये गेले. रहाटे आपल्या बहिणीसाठी घराच्या शोधात होते. साइट आॅफिसमध्ये त्यांची भेट वरुण मेहता या कर्मचाऱ्याशी झाली. रहाटे यांनी वरुणकडे फ्लॅटचा भाव आणि इतर चौकशी सुरू केली. तेव्हा रहाटे यांनी घर देता येणार नाही, असे बिल्डरच्या कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या रहाटे यांनी तत्काळ मालाड पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. मात्र मालाड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा रहाटे यांनी केला होता. पुढे हा प्रश्न मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उचलला. गुन्हा दाखल न झाल्यास गुरुवारी पुन्हा आंदोलन कण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर मालाड पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेऊन बिल्डर मेहता व त्यांचा कर्मचारी वरुण यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला.