विमानाचा शोध भलत्याच ठिकाणी?
By Admin | Updated: May 8, 2014 23:23 IST2014-05-08T23:23:21+5:302014-05-08T23:23:21+5:30
शोधमोहिमेचे ठिकाणच चुकले तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.

विमानाचा शोध भलत्याच ठिकाणी?
क्वालालंपूर : बेपत्ता विमानाच्या ब्लॅकबॉक्सचे मानले जाणारे संकेत हे शार्क, कासव आदी सागरी जीवांना जोडलेल्या उपग्रह टेहेळणी उपकरणाचे असू शकतात, असा दावा करण्यात आला असून त्यामुळे शोधमोहिमेचे ठिकाणच चुकले तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. कारण, याच संकेतांच्या आधारे हिंदी महासागराचा एक विशिष्ट मोठा भाग पिंजून काढण्यात आला आहे. बेपत्ता मलेशियन विमानाचा शोध घेणार्या पथकांना हिंदी महासागरात काही संकेत मिळाले होते. या संकेतांच्या फ्रिक्वेन्सीवरून ते बेपत्ता विमानाच्या ब्लॅकबॉक्सचे असल्याचे मानले जाते. मात्र, या गृहीतकास छेद देणारा दावा पुरातत्ववेत्ते आणि लेखक विल्यम मेचॅम यांनी केला आहे. त्यांच्या मतानुसार, हे संकेत सागरी जीवांच्या अभ्यासासाठी त्यांना जोडलेल्या उपकरणातून आलेले असू शकतात. विल्यम यांच्या या दाव्यामुळे शोधपथके चुकीच्या ठिकाणी विमानाचा शोध घेत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय शोधमोहीम गेल्या अनेक दिवसांपासून संकेत मिळालेल्या सागरी भागावरच केंद्रित असून चुकीच्या गृहीतकाने मोठ्या प्रमाणात पैशांचा व वेळेचा अपव्यय तर झाला नाही ना, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. हाँगकांग विद्यापीठाशी संलग्न असलेले मेचॅम यांनी मलेशियन इनसाईडरमध्ये लिहिलेल्या एका लेखात हा दावा केला आहे. गेल्या अनेक दशकांपासून खोल समुद्रातील जीवांचा माग काढण्यासाठी ३० ते ५० किलो हर्टझ एवढ्या फ्रिक्वेन्सीचे पिंगर्स वापरले जात आहेत, असे ते म्हणाले. हे उपकरण जोडलेला प्राणी पाण्यावर येताच त्याचे स्थान व इतर डेटा समुद्रातील रिसिव्हर्सना किंवा उपग्रहांना पाठविला जातो. मासेमारी जाळ्याचे संरक्षण करण्यासाठी ध्वनी पिंगर्सचा वापर केला जातो. यामुळे एकतर जाळ्याचे संरक्षण होतेच याशिवाय जाळ्यातील मासे चोरणारे शिकारी त्यामुळे दूर पळतात, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)