...तरीही लढत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच
By Admin | Updated: October 9, 2014 04:29 IST2014-10-09T04:29:30+5:302014-10-09T04:29:30+5:30
आतापर्यंत युती विरूद्ध आघाडी अशीच लढत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदार संघात आता चारही पक्ष आमने-आमने आले आहेत

...तरीही लढत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच
आतापर्यंत युती विरूद्ध आघाडी अशीच लढत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदार संघात आता चारही पक्ष आमने-आमने आले आहेत. तरीही चार मतदार संघातील प्रमुख लढत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होईल तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मात्र शिवसेना विरूद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होणार आहे. आघाडी सरकारमध्ये नऊ खात्यांचे राज्यमंत्रीपद भुषवलेल्या उदय सामंत यांचा शिवसेना प्रवेश ही जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची गोष्ट झाली आहे.
काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात १९९0 साली शिवसेना-भाजप युतीने आणि २00४पासून राष्ट्रवादीने शिरकाव केला. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीनेही चांगले स्थान निर्माण केले आहे.
आताच्या निवडणुकीत दापोली, चिपळूण या मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना, राजापूर मतदार संघात शिवसेना विरूद्ध काँग्रेस, गुहागर मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप तर रत्नागिरी मतदार संघात भाजप विरूद्ध शिवसेना अशी प्रमुख लढत होणार आहे.
दापोलीत पाचवेळा आमदार झालेल्या शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांना सहाव्यांदा आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या किशोर देसाई यांच्या बंडखोरीमुळे दळवी यांचा मार्ग काहीसा सोपा होणार आहे. गुहागर मतदार संघात राष्ट्रवादीचे मावळते कामगार मंत्री भास्कर जाधव यांना तुटलेल्या युतीचा पुन्हा एकदा फायदा होण्याची शक्यता आहे.
भाजपचे डॉ. विनय नातू यांनी गेल्या काही काळात शिवसेनेशी केलेली जुळवणी आणि मतदारांची केलेली आळवणी युती तुटल्यामुळे फारशी उपयोगात येणार नाही, असे दिसत आहे. चिपळूण मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्याकडून जोरदार टक्कर दिली जाण्याची अपेक्षा आहे. राजापूर मतदार संघात शिवसेनेचे राजन साळवी आणि काँग्रेसचे राजन देसाई अशी पारंपरिक पक्षीय लढत होणार आहे. त्यात शिवसेनेचे पारडे काहीसे जड आहे.
सर्वात उत्सुकता आहे ती रत्नागिरी मतदार संघात. राष्ट्रवादीचे उदय सामंत शिवसेनेत गेल्यामुळे ते आणि भाजपचे बाळ माने सलग तिसऱ्यांदा समोरासमोर येत आहेत. दोनवेळा आमदार झालेल्या सामंत यांना पक्षांतरामुळे त्यांना तिसरा विजय सोपा नाही. भाजपची बहुतांश भिस्त प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या मोदी यांच्या सभेवर आहे. म्हणूनच ही जागा अधिक चुरशीची होणार आहे. (प्रतिनिधी)