सत्तेच्या मानसिकतेतून बाहेर पडून संघर्ष करा!
By Admin | Updated: February 8, 2015 01:28 IST2015-02-08T01:28:34+5:302015-02-08T01:28:34+5:30
राज्यातील भाजपा सरकारला १०० दिवसांत एकही आश्वासन पाळता आले नाही. राज्यात सत्तेत असणाऱ्यांना आपण अजून सत्तेत आहोत, असे वाटत नाही.
सत्तेच्या मानसिकतेतून बाहेर पडून संघर्ष करा!
पुणे : राज्यातील भाजपा सरकारला १०० दिवसांत एकही आश्वासन पाळता आले नाही. राज्यात सत्तेत असणाऱ्यांना आपण अजून सत्तेत आहोत, असे वाटत नाही. पण आपण मात्र सत्तेत असल्याप्रमाणे वागतो. सत्ताधारी असल्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे, असा आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी केले.
राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते शनिवारी बालेवाडी क्रीडा संकूल येथे झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, माजीमंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, नवाब मलिक, मधुकर पिचड, खा़ सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून १५ वर्षे सत्तेत होता़ पहिल्यांदा आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे अद्याप नेते व कार्यकर्त्यांची मानसिकता तयार होत नाही. परंतु, सरकारने नऊ महिन्यांत कोणत्या अच्छे दिनच्या बाळाला जन्म दिला. त्याची माहिती घेऊन संघर्ष करा, असे आवाहन पटेल यांनी केले. विधिमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण, स्मार्ट व्हिलेज आणि न्याय व्यवस्थेच्या सुधारणासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढील काळात आंदोलने केली पाहिजेत, असा सल्ला त्रिपाठी यांनी दिला. आपल्या पक्षाचा संघर्ष सत्ताधाऱ्यांबरोबर आहे.आपल्या पक्षाची बांधणी व्यक्ती केंद्रीत न होता, पक्ष म्हणून संघटन झाले पाहिजे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुस्लीम आरक्षणाविषयी दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे एमआयएमचे ओवैसी नावाचे भूत तयार झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करीत आहेत, अशी टीका नवाब मलीक यांनी केली.