महापौरपदासाठी दटके, डवरे, जयस्वाल यांच्यात लढत
By Admin | Updated: September 2, 2014 01:15 IST2014-09-02T01:15:39+5:302014-09-02T01:15:39+5:30
महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत नागपूर विकास आघाडीचा विजय निश्चित असतानाही, सोमवारी काँग्रेस व बसपाने उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, काँग्रेसचे नगरसेवक

महापौरपदासाठी दटके, डवरे, जयस्वाल यांच्यात लढत
उपमहापौरपदासाठी पोकुलवार यांचा अर्ज : काँग्रेस व राष्ट्रवादीत संघर्षाची चिन्हे ं
नागपूर : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत नागपूर विकास आघाडीचा विजय निश्चित असतानाही, सोमवारी काँग्रेस व बसपाने उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, काँग्रेसचे नगरसेवक अरुण डवरे व बसपाच्या हर्षला जयस्वाल यांच्यात महापौरपदासाठी लढत होईल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पराभूत होणार असलो तरी लढा देऊ, अशी भूमिका काँग्रेस व बसपा या दोन्ही पक्षांनी घेतली. उपमहापौरपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीत एकमत नसल्याचे दिसून आले. दोन्ही पक्षांनी वेगवेगळे अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी भाजपतर्फे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी अर्जाचे चार संच दाखल केले, तर उपमहापौरपदासाठी अपक्षांचे गटनेते मुन्ना पोकुलवार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर अनिल सोले, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, अविनाश ठाकरे आदी उपस्थित होते.
काँग्रेसतर्फे नगरसेवक अरुण डवरे यांनी तर उपमहापौरपदासाठी सुजाता कोंबाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, प्रशांत धवड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीने महापौरपदासाठी उमेदवार दिला नाही. मात्र, उपमहापौरपदासाठी नगरसेवक राजू नागुलवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत आ. प्रकाश गजभिये, गटनेत्या प्रगती पाटील होत्या. बसपातर्फे शबाना परवीन मो. जमाल यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)
गरज पडल्यास फारकत!
काँग्रेस व राष्ट्रवादीने उपमहापौरपदासाठी वेगवेगळे उमेदवार रिंगणात उतरवीत गरज पडल्यास ते एकमेकांपासून फारकत घेऊ शकतात, याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून या दोन्ही पक्षात जुंपली आहे. त्याचे पडसाद नागपूर महापालिकेतही दिसू लागले आहेत. आजवर राष्ट्रवादीने महापालिकेत काँग्रेसला साथ दिली. आता उपमहापौरपदासाठी दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एक नवा राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे.