पुढच्या वर्षी बेस्ट करणार दोन वेळा भाडेवाढ

By Admin | Updated: October 22, 2014 06:13 IST2014-10-22T06:13:32+5:302014-10-22T06:13:32+5:30

निवडणुकीचे वर्ष सरताच बेस्टने भाडेवाढीचा डबल बार उडविण्याची तयारी केली आहे़ अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर बेस्ट उपक्रमाने सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ९४६ कोटी ३२ लाख रुपये शिलकी दाखविली आहे़

Festivities will be done twice a year for the best | पुढच्या वर्षी बेस्ट करणार दोन वेळा भाडेवाढ

पुढच्या वर्षी बेस्ट करणार दोन वेळा भाडेवाढ

मुंबई : निवडणुकीचे वर्ष सरताच बेस्टने भाडेवाढीचा डबल बार उडविण्याची तयारी केली आहे़ अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर बेस्ट उपक्रमाने सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ९४६ कोटी ३२ लाख रुपये शिलकी दाखविली आहे़ मात्र कामगारांची थकबाकी आणि कर्जाची परतफेड करण्यातच ही रक्कम खर्च होत असल्याने पुढच्या वर्षी दोन वेळा भाडेवाढ प्रस्तावित आहे़ त्यानुसार तिकिटांच्या दरात दोन रुपये तर मासिक पासमध्ये ३० ते ४० रुपये वाढ करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे़
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या आठवड्यात बेस्ट प्रशासनाने सीलबंद अर्थसंकल्प समितीला सादर केला होता़ बेस्ट समितीच्या आजच्या बैठकीत हा अर्थसंकल्प उघडण्यात आला़
मात्र हा अर्थसंकल्प शिलकी असल्यानंतरही बेस्टचे आर्थिक दुखणे संपलेले नाही़ त्यामुळे फेब्रुवारी आणि एप्रिल २०१५ अशी दोन वेळा भाडेवाढ करण्याची शिफारस प्रशासनाने
केली़ यापैकी एका भाडेवाढीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी गतवर्षीप्रमाणे दीडशे कोटी अनुदान द्या, अशी गुगलीच बेस्टने पालिकेपुढे टाकली़
तिसऱ्या वर्षीही बोनस नाही
इंधन व सुट्ट्या भागांच्या दरात सतत होणारी वाढ तसेच महागाई अशी अनेक कारणं देत प्रशासनाने बेस्ट कामगारांना सलग तिसऱ्या वर्षी सानुग्रह अनुदान नाकारले आहे़ त्यामुळे बेस्टमधील ४४ हजार कामगार-अधिकाऱ्यांचा यंदाच्या दिवाळीतही हिरमोड झाला आहे़
बेस्ट उपक्रमाचा आर्थिक डोलारा ढासळला असल्याने कामगारांचे दर महिन्याचे वेतन मिळण्यासही २० दिवसांचा विलंब होत आहे़ मात्र सन २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रम ९४६ कोटींच्या शिलकीत आल्यामुळे यंदा सानुग्रह अनुदान मिळण्याची आशा कामगारांना होती़ यासाठी कामगारांनी सोमवारी आझाद मैदानात आंदोलनही केले होते़
परंतु अर्थसंकल्प शिलकीत असला तरीही रक्कम बँकेचे कर्ज आणि सुधारित वेतनश्रेणीची थकबाकी चुकती करण्यात संपणार आहे़ त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे यंदाही कामगारांना सानुग्रह अनुदान देता येणार नाही, अशी भूमिका बेस्ट प्रशासनाने घेतली आहे़ तशी अर्थसंकल्पातही सानुग्रह अनुदानासाठी तरतूद करण्यात आलेली नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Festivities will be done twice a year for the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.