सातपुड्यात रंगला पशुपतीनाथांचा महोत्सव

By Admin | Updated: September 30, 2014 00:13 IST2014-09-30T00:10:38+5:302014-09-30T00:13:52+5:30

हजारो वर्षे जुनी परंपरा, वृषभराजांनी घेतले दर्शन

Festival of Pashupatinatha in Satpurad | सातपुड्यात रंगला पशुपतीनाथांचा महोत्सव

सातपुड्यात रंगला पशुपतीनाथांचा महोत्सव

जयदेव वानखडे /जळगाव जामोद (बुलडाणा)
एक हजार वर्षाची परंपरा लाभलेला पशुपतीनाथ महोत्सव सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सातपुड्यामध्ये पारंपारिक पध्दतीने साजरा झाला. पश्‍चिम वर्‍हाडासह खान्देशातील शेकडो वृषभराजांना शेतकर्‍यांनी परंपरागत पशुपतीनाथाचे दर्शन घडवून, वर्षभर राबणार्‍या या मुक्या जिवाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
नवरात्रामध्ये घटस्थापनेनंतर येणार्‍या पहिल्या सोमवारी हा महोत्सव असतो. या दिवसाला शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्व असते. बैलगाड्या, छकडे घेऊन मोठय़ा प्रमाणात शेतकरी सातपुड्यात दाखल झाले. याठिकाणी बैलांचे स्नान करायचे, त्यानंतर पशुपतीनाथाचे दर्शन करून अंगारा लावायचा आणि गुळाचा प्रसाद वाटला की, वर्षभर बैलावर नैसर्गिक आरिष्ट येत नाही, त्यांना रोगराई होत नाही, असा विश्‍वास दृढ शेतकर्‍यांमध्ये आहे. त्यामुळेच शेकडो वर्षापासून या महोत्सवाची परंपरा अविरत पणे सुरू आहे. आकोट, तेल्हारा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मुक्ताईनगर आणि सातपुड्याच्या कुशीतील सर्व गावांमधून शेतकरी वर्ग मोठय़ा संख्येने आपआपल्या बैलगाड्या घेवून या महोत्सवात सहभागी झाले.
जळगाव तालुक्याच्या उत्तरेस १0 कि.मी. अंतरावर सातपुड्यात पशुपतीनाथाचे पुरातन मंदिर वसले आहे. हे मंदिर म्हणजे पुरातन वास्तू आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. काळाच्या ओघात मंदिराची पडझड झाली; मात्र प्रवेशव्दार सुस्थितीत आहे. निसर्गरम्य परिसर, तुडूंब भरलेली धरणे आणि झुळझुळ वाहणार्‍या नद्या सर्वांनाच आकर्षित करतात.
या महोत्सवासाठी जवळपास ३ हजार शेतकरी बैलगाड्या घेवून आले होते. वर्षभर काबाडकष्ट करणार्‍या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होता यावे, म्हणून ज्यांच्या घरी बैलजोडी आहे, असा प्रत्येक शेतकरी या महोत्सवात सहभागी होतो.

Web Title: Festival of Pashupatinatha in Satpurad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.