महिला आमदार सरसावल्या
By Admin | Updated: March 20, 2017 03:11 IST2017-03-20T03:11:05+5:302017-03-20T03:11:05+5:30
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना, विरोधकांनी गोंधळ घालून वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला

महिला आमदार सरसावल्या
अतुल कुलकर्णी / मुंबई
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना, विरोधकांनी गोंधळ घालून वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण विरोधकांच्या घोषणाबाजीला न जुमानता मुनगंटीवारांनी तब्बल दोन तास आपले घोडे नेटाने दामटले. विशेष म्हणजे, दोन्ही काँग्रेसच्या महिला सदस्यांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील पहिल्यांदा वेलमध्ये उतरल्या. ते पाहून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यादेखील सरकारविरोधी घोषणा देत वेलमध्ये उतरल्या, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी गळ्यात अडकवलेला टाळ वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये उत्साह संचारला. गंगाखेडचे राष्ट्रवादीचे आ. मधुसुदन केंद्रे हे वित्तमंत्र्यांच्या प्रत्येक घोषणेगणिस ‘गाजर दिलं...गाजर दिलं..!’ म्हणत होते.
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना उद्देशून तुम्ही जरा खाली बसा, तुमचे पाय दुखत असतील, असा सल्ला दिला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण लगेच उठून उभे राहिले. बजेटचे भाषण संपेपर्यंत पूर्ण दोन तास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात उभे होते, तर पतंगराव कदम यांची सतत उठबस सुरू होती. कोकणी लोक ‘व्हय महाराजा’ म्हणत ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालतात, तसे भास्कर जाधव कर्जमाफी करा, अशा घोषणा द्यायचे आणि बाकी सदस्य ‘व्हय महाराजाऽऽऽ!’ म्हणत त्यांच्या मागे ओरडायचे. वित्तमंत्र्यांनी देशी विदेशी मद्यावरील करांच्या संबंधी मजकूर वाचत असतानाच विरोधकांच्या घोषणा थंडावल्या. नेमकी तीच वेळ साधत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, ‘बघा, हा विषय विरोधक शांतपणे ऐकत आहेत,’ असा जोरदार चिमटा काढला आणि मुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांसह सारे सभागृह हास्यात डुंबून गेले, पण दुसऱ्याच क्षणी विरोधकांनी घोषणांचा जयघोष चालू ठेवला.काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, रणजित कांबळे अर्थसंकल्प सुरू झाल्यानंतर, १० मिनिटे उशिराने सभागृहात आले, तर कालीदास कोळंबकर बराच वेळ स्वत:च्या जागेवर बसून होते. मंत्री महादेव जानकरांनी घोषणा देणाऱ्या आ. अब्दुल्ल सत्तार यांना स्वत:जवळ बोलावून घेतले आणि बराच वेळ बसवून ठेवले. एमआयएमचे आमदार विरोधकांच्या घोषणाबाजीत सहभागी झाले नाहीत.