गुन्हा दाखल, पण सुटकेचा मार्गही केलाय मोकळा !
By Admin | Updated: February 4, 2015 02:24 IST2015-02-04T02:24:18+5:302015-02-04T02:24:18+5:30
ओल्या पार्टीप्रकरणी पोलिसांनी केवळ सार्वजनिक शांततेच्या भंगाचा व रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविल्याबाबत गुन्हा दाखल केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

गुन्हा दाखल, पण सुटकेचा मार्गही केलाय मोकळा !
नाशिक : थेट संरक्षण विभागाच्या अखत्यारितील विमानतळावरच सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या निरोपाच्या ओल्या पार्टीप्रकरणी पोलिसांनी केवळ सार्वजनिक शांततेच्या भंगाचा व रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविल्याबाबत गुन्हा दाखल केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. संबंधितांवर काहीच कारवाई करण्यात न आल्याने यामागे एका मोठ्या नेत्याचे नाव आता दबक्या आवाजात घेतले जात आहे.
दिंडोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हर्ष कन्स्ट्रक्शनचे मालक विलास केदू बिरारी, बिल्डर्स असोशिएशन आॅफ नाशिक शाखेचे सर्व पदाधिकारी, सुनील ढगे तसेच डिंगोरे मंडप डेकोरेटर्स या सर्वांविरोधात ३१ जानेवारीच्या रात्री नऊ वाजेपासून ते रात्री दीड वाजेपर्यंत बेकायदा विनापरवाना सार्वजनिक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करून रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी उपअधीक्षक गुंजाळ यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला होता. त्यानुसारच गुन्हा दाखल झाला काय? अहवालात नेमके काय होते? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी या प्रकरणी सविस्तर अहवाल मागवून बहुचर्चित पार्टीत सहभागी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
मद्यपानाच्या पार्टीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जागा कशी देता येते असा सवाल उपस्थित होताच, घाईगर्दीने ठेकेदार विलास बिरारी यांनी दहा हजार रुपये भाड्यापोटी भरले.