...या तर देशवासीयांच्या भावना - संजय राऊत
By Admin | Updated: October 19, 2015 12:32 IST2015-10-19T12:30:53+5:302015-10-19T12:32:07+5:30
भारत - पाकिस्तान मालिकेला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात घातलेल्या गोंधळाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केले आहे.

...या तर देशवासीयांच्या भावना - संजय राऊत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - भारत - पाकिस्तान मालिकेला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात घातलेल्या गोंधळाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. या शिवसैनिकांच्या नव्हे तर संपूर्ण देशवासियांच्या भावना आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर भारत - पाकिस्तान सामने झाले नाही तर आभाळ कोसळणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्त माधव भंडारी यांनी दिली आहे.
भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी सोमवारी बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पदाधिका-यांमध्ये बैठक होणार होती. मात्र या बैठकीला शिवसेनेने विरोध दर्शवला असून मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी या मालिकेला विरोध दर्शवला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या झुंडशाहीविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र या विरोधाचे समर्थन केले. आमच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेतली आणि चर्चेला विरोध दर्शवला असेही त्यांनी सांगितले.
विरोध प्रदर्शन आम्ही समजू शकतो, पण गुंडगिरी आम्हाला अमान्य आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली आहे. पण राज्यातील भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी मात्र अप्रत्यक्षपणे शिवसेनेला पाठिंबा दिला. भारत - पाक मालिकेला शिवसेनेने नेहमीच विरोध दर्शवला आहे, त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे, भारत - पाक मालिका नाही झाली तर आभाळ कोसळणार नाही असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.