निवडणुकीत ‘नोटा’चा वापर अधिक होण्याची भीती

By Admin | Updated: April 4, 2017 03:30 IST2017-04-04T03:30:06+5:302017-04-04T03:30:06+5:30

पनवेल महानगरपालिका निवडणूक मे महिन्यात पार पडणार आहे. मात्र मतदार याद्यांमधील गोंधळामुळे सामान्य मतदार दुखावला गेल्याची शक्यता आहे.

Fear of use of 'nota' in elections | निवडणुकीत ‘नोटा’चा वापर अधिक होण्याची भीती

निवडणुकीत ‘नोटा’चा वापर अधिक होण्याची भीती

वैभव गायकर,
पनवेल- पनवेल महानगरपालिका निवडणूक मे महिन्यात पार पडणार आहे. मात्र मतदार याद्यांमधील गोंधळामुळे सामान्य मतदार दुखावला गेल्याची शक्यता आहे. एक नव्हे तर दोन वेळा हरकती नोंदवून देखील एका प्रभागाची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने नाराज मतदारांकडून ‘नोटा’ बटण वापरण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येत आहे. कारण आपल्या प्रभागातील उमेदवार सोडून दुसऱ्या प्रभागातील अनोळखी उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा नोटा बटण दाबलेलेच बरे, असा प्रश्न काही मतदार उपस्थित करीत आहेत.
पनवेल महापालिकेत एकूण १८ प्रभाग आहेत. जवळजवळ २० हजार मतदारांचा कमीत कमी एक प्रभाग आहे. काही प्रभागात ३० हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. अशा स्थितीत शेकडो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेली असल्याने सामान्य मतदार नाराज झाला आहे. विशेष म्हणजे ट्रू व्होटर या निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरवर तक्रारी नोंदवून देखील काहीच फरक पडला नसल्याने अनेक मतदारांचा हिरमोड झाला आहे. ३१ मार्च रोजी या याद्यांच्या झालेल्या घोळासंदर्भात हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख आहे. मात्र पहिल्या वेळेला हरकती नोंदवून काहीच उपयोग झाला नसल्याने अनेक मतदारांना या वेळेला नावे सुरळीत प्रकारे आपल्याच प्रभागात येतील असा विश्वास नसल्याने ‘नोटा’चा उपयोग होण्याची शक्यता खारघर मधील रहिवासी सचिन सावंत, चंद्रकांत कदम यांनी व्यक्त केली.
नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगर पालिकेत एकूण ४ लाख २५ हजार ४५३ एवढी मतदार संख्या आहे. सर्व प्रभागांचा आढावा घेतल्यानंतर जवळजवळ ४० हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. त्यामुळे आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याची संधी त्यांना मिळणार नसल्याने ‘नोटा’चा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या वतीने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना शुक्रवारी निवेदन दिले. मतदार याद्यांचा घोळ झाल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: Fear of use of 'nota' in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.