नेरुळमध्ये साथीच्या आजारांची भीती

By Admin | Updated: July 20, 2016 02:56 IST2016-07-20T02:56:42+5:302016-07-20T02:56:42+5:30

सिडको व पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेरूळ सेक्टर २० मधील बहुमजली इमारतीवर कारवाई केली होती.

Fear of pandemic diseases in Nerul | नेरुळमध्ये साथीच्या आजारांची भीती

नेरुळमध्ये साथीच्या आजारांची भीती


नवी मुंबई : सिडको व पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेरूळ सेक्टर २० मधील बहुमजली इमारतीवर कारवाई केली होती. परंतु इमारतीचे अर्धे बांधकाम तसेच ठेवण्यात आले आहे. यामध्ये पाणी साचून साथीचे आजार पसरण्याची शक्यता असून बांधकाम कोसळून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
बालाजी डोंगराकडे जाणाऱ्या रोडला लागून अनधिकृतपणे पाच मजल्याची इमारत बांधण्यात आली होती. या अतिक्रमणावर सिडको व पालिकेच्या पथकाने जूनमध्ये कारवाई केली होती. वास्तविक अतिक्रमण विभागाने सर्व बांधकाम जमीनदोस्त करून अतिक्रमण झालेला भूखंड मोकळा करणे अपेक्षित असते. बांधकामाचे डेब्रिज इतर सर्व कचरा तेथून हटविणे आवश्यक आहे. परंतु सिडको बहुतांश इमारतींचे बांधकाम अर्धवट पाडून निघून जाते. यामधील काही इमारतींचे बांधकाम पुन्हा केले जात असून बांधकाम करण्यासारखी स्थिती नसेल तर अर्धवट पाडलेली इमारत त्याच ठिकाणी उभी असते. बालाजी टेकडीवरील इमारतही अशाचप्रकारे उभी आहे. पावसाळ्यामध्ये ही इमारत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य रोडला लागून हे बांधकाम असल्याने अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
अतिक्रमण विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. अर्धवट पाडलेल्या इमारतींमध्ये पावसाचे पाणी साचून परिसरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागली आहे. दोन्ही प्रशासनाने तत्काळ बांधकाम हटविलेल्या ठिकाणावरून डेब्रिज उचलावे व शिल्लक कारवाईही पूर्ण केली जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात जर आजारामुळे कोणाचा मृत्यू झाला किंवा अपघात घडल्यास त्याला पूर्णपणे अतिक्रमण विभाग जबाबदार असेल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fear of pandemic diseases in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.