मुंबई - केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून त्यात गेल्या १० वर्षातील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक अवघ्या ९ महिन्यात महाराष्ट्रात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूकमहाराष्ट्रात आली आहे. ही गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. महायुती सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच या आर्थिक वर्षातील तिमाही आणखी बाकी आहे. सर्वाधिक परकीय गुंतवणुकीबाबत संपूर्ण महाराष्ट्राचे मी अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची घौडदौड अशीच कायम राहील असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
कोणत्या राज्यात किती परकीय गुंतवणूक?
महाराष्ट्र - १ लाख ३९ हजार ४३४ कोटीगुजरात - ४६ हजार ६८७ कोटीकर्नाटक - ३७ हजार ६४७ कोटीदिल्ली - ३७ हजार ३३६ कोटीतामिळनाडू - २४ हजार ३७४ कोटीहरियाणा - २३ हजार ९५५ कोटीतेलंगाणा - १७ हजार ३४३ कोटीराजस्थान - २ हजार ३८७ कोटीउत्तर प्रदेश - २ हजार ५८५ कोटी
अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले होते. दावोसमध्ये दरवर्षी होणाऱ्या वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये ते सहभागी झाले होते. फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ३ वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी झाले होते. यंदाच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रात १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे ६१ सामंजस्य करार झालेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.