दिवाळीत फराळाच्या पदार्थांवर एफडीएचा पहारा!
By Admin | Updated: October 11, 2014 06:01 IST2014-10-11T06:01:10+5:302014-10-11T06:01:10+5:30
दिवाळीतील फराळामधील भेसळीला आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यपदार्थांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे

दिवाळीत फराळाच्या पदार्थांवर एफडीएचा पहारा!
पुणे : दिवाळीतील फराळामधील भेसळीला आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यपदार्थांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तेल, तूप, रवा, मैदा, बेसन, मिठाईच्या नमुन्यांची एफडीएकडून तपासणी सुरू आहे.
दिवाळीला घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जातात. त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालात भेसळ करण्याचे प्रकार घडतात. दिवाळीच्या तोंडावर निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचे वितरण होऊ नये, यासाठी एफडीएतर्फे दरवर्षी अन्न पदार्थांची तपासणी करण्यात येते. एफडीएने दुधाचे-१२, तेल-८, वनस्पती तूप-७, तूप-३, रवा-४, मैदा-७, बेसन-५, मिठाई-७, नमकीन-१, खवा- २ व मसाल्याचे ३ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती एफडीएचे सह-आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.
मिठाईला चांदीऐवजी अॅल्युमिनिअम फॉईल लावण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अॅल्युमिनिअम मानवी आरोग्यास घातक आहे. त्याचा अंश पोटात साठून राहतो. त्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे मिठाईच्या निर्मितीवर एफडीएकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
पाच वर्षांपासून केंद्र सरकारने चिनी चॉकलेटवर बंदी घातली आहे. त्यात मेलॅमाईन नावाचा घटक असतो. तो आरोग्यास घातक आहे. चीनमधील उत्पादक बाहेरच्या देशांतच अशा चॉकलेटची विक्री करतात. छुप्या मार्गाने त्याची विक्री होऊ नये यासाठी एफडीए दक्ष आहे. स्थानिक चॉकलेटची विक्री करताना पावती दिली जात आहे की नाही, हेही तपासण्यात येत आहे. एखाद्या चॉकलेटमध्ये अपायकारक घटक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. (प्रतिनिधी)