पॅकबंद फूडवर एफडीएची नजर
By Admin | Updated: June 7, 2015 01:48 IST2015-06-07T01:48:44+5:302015-06-07T01:48:44+5:30
बाजारात सध्या अनेक बॅ्रण्डचे इस्टंट फूड उपलब्ध आहे. पण, मॅगीत जास्त प्रमाणात आढळलेल्या शिसामुळे इतर उत्पादनांवरही एफडीए आता नजर ठेवणार आहे.

पॅकबंद फूडवर एफडीएची नजर
मुंबई : बाजारात सध्या अनेक बॅ्रण्डचे इस्टंट फूड उपलब्ध आहे. पण, मॅगीत जास्त प्रमाणात आढळलेल्या शिसामुळे इतर उत्पादनांवरही एफडीए आता नजर ठेवणार आहे.
मॅगीत जास्त प्रमाणात आढळलेले शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) हे आरोग्यास हानिकारक आहे. मॅगीशी साधर्म्य साधणारे इतर पदार्थ अजून बाजारात उपलब्ध आहेत. उत्पादन बाजारात येते त्या वेळी त्याची तपासणी केली जाते. या तपासणीत योग्य प्रमाणात पदार्थ आढळल्यावरच या उत्पादनांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. पण, प्रत्येक बॅचप्रमाणे काहीवेळा प्रमाणात बदल होऊ शकतात. म्हणूनच एफडीए पुढच्या काळात या उत्पादनांचे नमुने घेणार आहे.
एखादा खाद्यपदार्थ जास्त काळ टिकावा म्हणून त्यात काही प्रमाणात प्रिझरव्हेटिव्ह घातले जातात. पण, या पदार्थांचे प्रमाण जास्त झाल्यास आरोग्यास हानिकारक ठरतात. संभाव्य धोके टाळण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. न्यूडल्सच्या बरोबरीनेच जॅम, सरबत, इन्स्टंट भाजी आणि इतर अन्नपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. लहान मुले वेफर्सचे विविध प्रकार आवडीने खातात. यातही मसाला आणि इतर पदार्थ असतात. सध्या बाजारात १० हजारपेक्षा अधिक पॅकबंद अन्नपदार्थ उपलब्ध आहेत. सर्व अन्नपदार्थांची तपासणी करणे शक्य नाही. पण, पुढच्या काही दिवसांतच काही पदार्थ तपासणीसाठी घेण्यात येतील, असे एफडीए अधिकाऱ्याने सांगितले.