पित्याची आत्महत्या
By Admin | Updated: September 8, 2016 05:48 IST2016-09-08T05:48:44+5:302016-09-08T05:48:44+5:30
नात्यातील टवाळखोर तरुणांकडून मुलीच्या सतत होणाऱ्या छेडछाडीमुळे व्यथित झालेल्या पित्याने विषप्राशन केल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव येथे घडली.

पित्याची आत्महत्या
मिरजगाव (अहमदनगर) : नात्यातील टवाळखोर तरुणांकडून मुलीच्या सतत होणाऱ्या छेडछाडीमुळे व्यथित झालेल्या पित्याने विषप्राशन केल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव येथे घडली. पोपट मारुती पुराण (४१) असे या पित्याचे नाव असून, उपचारांदरम्यान मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
२१ आॅगस्टला हरिनाम सप्ताहानिमित्त पोपट काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठी पत्नीसोबत गावात गेले होते. मिरजगावच्या शाळेत दहावीत शिकणारी त्यांची मुलगी घरी एकटीच होती. याचा फायदा घेत आरोपी केतन भाऊसाहेब लाढाणे याने घरात घुसून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने वस्तीपासून दोन किलोमीटर अंतरावरील गावात पळत येऊन कीर्तनात दंग असलेल्या आईवडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर, आईने याबाबत मिरजगाव पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी व त्याचा मित्र या दोघांना अटक केली.
दुसऱ्या दिवशी गावातील प्रतिष्ठितांच्या मध्यस्थीने व आरोपी नातेवाईक असल्याने मुलीच्या आईने तक्रार मागे घेतली. त्याचदिवशी त्या दोघांना समज देऊन सोडण्यात आले. मात्र, आरोपीने त्यानंतरही मुलीची छेड काढणे सुरूच ठेवले. स्वभावाने गरीब असलेल्या पोपट यांनी आरोपीच्या आजोबाला हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांचीही आरोपीला साथ असल्याचे लक्षात आल्यानंतर, हताश झालेल्या पोपट यांनी शुक्रवारी रात्री विषप्राशन केले. त्यांना उपचारांसाठी नगरला हलविण्यात आले. मात्र, मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले.
या प्रकरणी शनिवारी मुलीची फिर्याद कर्जत पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. मात्र, आरोपींविरुद्ध अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. (वार्ताहर)