मुलींना विष पाजून वडिलांची आत्महत्या
By Admin | Updated: November 13, 2016 04:43 IST2016-11-13T04:43:46+5:302016-11-13T04:43:46+5:30
संपत्तीच्या वादातून पोटच्या तीन मुलींना विष देऊन वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साकीनाका येथे घडली. यामध्ये भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून

मुलींना विष पाजून वडिलांची आत्महत्या
मुंबई : संपत्तीच्या वादातून पोटच्या तीन मुलींना विष देऊन वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साकीनाका येथे घडली. यामध्ये भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून त्याने हे पाऊल उचलल्याबाबतची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. सुसाईड नोटच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
येणार असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली.
मंगेश राजाराम आणेराव (४०) असे या वडिलांचे नाव आहे. बेरोजगार आणेराव यांना दारूचे व्यसन होते. साकीनाका परिसरातील मोहली पाइपलाइन, रमेश सुदन चाळीत ते पत्नी, एक मुलगा आणि तीन मुलींसोबत राहायचे. अज्ञना (१), आरोही (१), हर्षिता (४) अशी त्यांच्या चिमुकलींची नावे आहेत. याच घरात त्यांचा भाऊ नरेंद्र, त्याची पत्नी आणि वडीलदेखील राहतात. शनिवारी सकाळी ७च्या सुमारास घरात कोणी नसताना आणेराव यांनी त्यांच्या एक वर्षाच्या दोन जुळ्या मुली आणि चार वर्षांच्या एका मुलीला विष पाजले. त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वत:ही गळफास घेत स्वत:ला संपविले. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये आणेराव आणि त्यांच्या भावाचे राहत्या घराच्या वाट्यावरून वाद सुरू होते.या घटनेमुळे साकीनाका परिसरात शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)
घर विकण्याच्या निर्णयाला विरोध
मंगेश यांचे वडील राजाराम यांनी हे घर विकून त्याचे तीन वाटे करण्याचे ठरविले. ज्यात एक वाटा आणेराव, दुसरा नरेंद्र तर तिसरा त्यांचे वडील राजाराम यांचा असणार होता. मात्र रूम विकण्याच्या निर्णयाला आणेरावचा विरोध होता.
कारण घर विकले तर राहायचे कुठे अशी चिंता त्यांना सतावू लागली. त्यावरून त्यांचे भाऊ आणि वहिनीसोबत खटके उडत होते. शनिवारी त्यांनी पत्नी आणि मुलाला मीरारोडला त्यांच्या नातेवाइकांकडे पाठविले. त्यानंतर मुलींना विष पाजून आत्महत्या केली.
नातेवाईकांना ठरविले जबाबदार
सुसाईड नोटमध्ये भाऊ आणि वहिनीला जबाबदार ठरविले आहे. ‘सध्या आम्ही या सर्वांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. या प्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो’, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.