पितृपक्षातील कावळे उडाले, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
By Admin | Updated: September 26, 2014 13:00 IST2014-09-26T09:00:27+5:302014-09-26T13:00:41+5:30
महाराष्ट्राच्या आयुष्यातील अमावस्या संपली असून पितृपक्षाचे कावळे उडाले व आता शूर मावळेच राहिले आहेत असा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पितृपक्षातील कावळे उडाले, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - महाराष्ट्रातील २५ वर्ष जुनी युती तुटली हे दुर्दैवच असले तरी आम्ही युती टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्राच्या आयुष्यातील अमावस्या संपली असून पितृपक्षाचे कावळे उडाले व आता शूर मावळेच राहिले आहेत असा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेना - भाजपची २५ वर्षांची युती गुरुवारी तुटल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. यात उद्धव ठाकरे म्हणतात, राजकारणामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याचे गणित बिघडल्यास इतिहास माफ करणार नाही. सध्या प्रत्येक पक्षात 'सेनापती' तयार झाले आहेत. काल जे या तंबूत आरती करत होते ते दुस-याच क्षणी दुस-या तंबूत जाऊन नमाज पढतात. विचार, निष्ठा या शब्दांना काही मोलच उरलेले नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना - भाजप युती राहावी अशी भावना मित्रपक्षांसह महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचीही होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे शत्रूच आहेत असे खडेबोलही त्यांनी भाजपला सुनावले आहेत.