वडिलांना अग्नी देऊन दिला बारावीचा पेपर
By Admin | Updated: February 27, 2015 02:02 IST2015-02-27T02:02:03+5:302015-02-27T02:02:03+5:30
सहा महिन्यांपूर्वीच ती आईच्या मायेला पारखी झाली, त्यातच वडीलांचेही छत्र हरपले. मात्र शिक्षणाचा ध्यास घेत श्रद्धाने वडिलांना अग्नी देऊन बारावीचा पेपर लिहिला

वडिलांना अग्नी देऊन दिला बारावीचा पेपर
हडपसर : सहा महिन्यांपूर्वीच ती आईच्या मायेला पारखी झाली, त्यातच वडीलांचेही छत्र हरपले. मात्र शिक्षणाचा ध्यास घेत श्रद्धाने वडिलांना अग्नी देऊन बारावीचा पेपर लिहिला. शिक्षणावरील या श्रद्धेने तिने विद्यार्थीमित्रांपुढे नवा आदर्श ठेवला आहे.
श्रद्धा मनोज कदम (१९, रा. ढेरे बंगला, गोपाळपट्टी, मांजरी बु.) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर बारावीचा दुसरा पेपर दिला आणि लगेचच वडिलांच्या निधनाची बातमी तिला ऐकावी लागली. बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास वडिलांचे निधन झाले. गुरुवार सकाळी साडे नऊ वाजता श्रद्धाने वडिलांना मांजरी गावातील स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला व ११ वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाली.
दरम्यान, श्रद्धाला पेपर देण्यास धीर मिळावा म्हणून तिच्या चुलत बहिणीला गुरुवारी परीक्षा हॉलच्या बाहेर बसविण्या आले होते, असे साधना विद्यालयाचे प्राचार्या के. डी. रत्नपारखी यांनी सांगितले.
श्रद्धा कदम या विद्यार्थिनीवर झालेला भावनिक आघात पाहता तिने परीक्षेला दाखविलेली उपस्थिती सर्वच विद्यार्थ्यांना आदर्श ठरली. आज दिवसभर हडपसरमध्ये तिच्या उपस्थितीचा विषय चर्चेचा ठरला.