पित्याने केला मुलीचा गळा दाबून खून
By Admin | Updated: October 31, 2014 01:33 IST2014-10-31T01:32:01+5:302014-10-31T01:33:19+5:30
मुर्तिजापूर तालुक्यातील घटना, एक महिन्याच्या बालिकेला मारून विहिरीत फेकले.

पित्याने केला मुलीचा गळा दाबून खून
मूर्तिजापूर (अकोला) : दोन मुलीच्या पाठीवर पत्नीने पुन्हा तिसर्या मुलीस जन्म दिल्याने संतापलेल्या पित्याने क्रौर्याची परिसीमा गाठत, एक महिन्याच्या कोवळ्या बालिकेचा गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह या क्रूरकर्माने गावातील विहिरीत फेकून दिला. मूर्तिजापूर तालुक्यातील बोर्टा गावात गुरूवारी ही घटना उघडकीस आली.
माना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्टा येथील रहिवासी कैलाश आप्पाराव बुंधोट (४0) हा गावात शेती करीत असून, टी.व्ही., फ्रीज आदी दुरुस्त करण्याचे कामही तो करतो. त्याला दोन मुली आहेत. एक महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीने तिसर्या मुलीस जन्म दिला.
दोन मुलीच्या पाठोपाठ तिसरी मुलगीच झाल्याने त्याने दारू पिणे सुरू केले. २८ ऑक्टोबर रोजी कैलाशने दारूच्या नशेत पत्नीशी भांडण केले. त्याने पत्नीला ११ व १३ वर्षे वयाच्या दोन मुलींसह घराबाहेर काढून दिले; मात्र एक महिन्याच्या मुलीस त्याने स्वत: जवळ ठेवून, घराचे दार आतून बंद करून घेतले. त्यानंतर त्याने या निष्पाप बालिकेचा गळा दाबून खून केला. नंतर तिचा मृतदेह कपड्यामध्ये गुंडाळून, तो गावातील नागोबा मंदिरानजीकच्या विहिरीत फेकला.
पित्याच्या या निर्दयी कृत्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी कैलाशची पत्नी वर्षा हिने माना पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली. तपासात एक महिन्याच्या बालिकेचा कपड्यात गुंडाळलेला मृतदेह पोलिसांना आढळला. घटनेचा उलगडा झाल्यानंतर पित्याच्या निर्दयतेचा उलगडा झाला. याप्रकरणी माना पोलिसांनी आरोपी कैलाश बुंधोटविरुद्ध भादंविचे कलम ३0२ , २0१ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. बालिकेचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.